दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑगस्ट २०२२ । मुंबई । महाप्रितने ग्रीन फंड इन्व्हेस्टर मिट -2022 च्या माध्यमातून विकासक व गुंतवणुक संस्था यांना एकाच व्यासपीठावर आणून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची साखळी निर्माण करण्याचा केलेला संकल्प कौतुकास्पद असल्याचे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
जुहू येथील जेडब्लू मेरियट हॉटेल येथे महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादितने मुंबईत आयोजिलेल्या महाप्रित हरितनिधी गुंतवणूक बैठकीत विविध २२ प्रकल्पांसाठी तब्बल २५ हजार ३६१ कोटी रूपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन, इरेडा , ग्रो बेटर ऍग्री ओव्हरसीज, इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांच्यासह अनेक नामवंत कंपन्यांनी यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “महाप्रित कंपनी सौरऊर्जा प्रकल्प, इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशन, कृषी प्रक्रिया मुख्य साखळी, परवडणारी घरे, महामार्ग रस्ते प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन, सॉफ्टवेअर तंत्रज्ञान तसेच सामाजिक बांधिलकी व सामुदायिक विकास क्षेत्र व त्यात लागू असलेले महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या विभागाच्या योजना, प्रकल्प व धोरणे राबवित आहे, हे कौतुकास्पद आहे. ‘महाप्रित’ने ग्रीन फंड इन्व्हेस्टर मिट -2022 आयोजित केली आहे. यामध्ये विकासक व गुंतवणूक संस्था यांना एकाच व्यासपीठावर आणून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची साखळी निर्माण करण्याचा संकल्प ‘महाप्रित’ने केला आहे तो संकल्प लवकरच पूर्ण होईल, याची खात्री आहे.” असेही श्री. शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होताना म्हणाले, “महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने एप्रिल २०२१ मध्ये महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्यौगिकी मर्यादित अर्थात महाप्रित म्हणून वेगळी उपकंपनी स्थापन केली. नागपूर महानगरपालिका आणि महाप्रित यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत पात्र स्थानिक उद्योजकांना उद्योग सुरू करण्यास मदत होऊन समाजातील दुर्बल घटकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, ही चांगली बाब असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.”
या बैठकीला महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, बी.एस.सी चे चेअरमन व रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे माजी उपगव्हर्नर सुभाष मुन्द्रा, निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी, निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. विजय सतबीर सिंग, निवृत्त प्रशासकीय अधिकारी उमाकांत दांगट, निवृत्त अतिरिक्त पोलिस महासंचालक धनंजय कमलाकर, अखिल भारतीय इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष विजय कलंत्री, डॉ. दीपक म्हैसेकर, ईरडाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार दास, ईबीटीएसचे व्यवस्थापकीय संचालक पॉल जेसेन, एन.आय.आय.एफ.चे अजय सक्सेना, निवृत्त तांत्रिक शिक्षण कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. एस. एस. मंथा, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, आय.सी.ए.आय.चे निलेश विकमसी, महाप्रितचे संचालक (संचलन) विजयकुमार काळम-पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्हिडिओ चित्रफितीद्वारे दाखविण्यात आलेल्या ‘महाप्रित’ कंपनीतर्फे समाजातील दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध नावीन्यपूर्ण प्रकल्पाची प्रशंसा केली. तसेच हरितनिधी गुंतवणूक चर्चासत्राला शुभेच्छा दिल्या.
इंडो ब्रिटीश फोरमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कविता शर्मा यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थितांशी संवाद साधला. ‘महाप्रित’च्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत योग्य ती कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी म्हणाले, गुंतवणूकदार व विकासक यांना एकाच मंचावर आणून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची साखळी निर्माण होईल. मागासवर्गीय समाजातील घटकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या प्रकल्पातून मिळणारे अतिरिक्त उत्पन्न महात्मा फुले विकास महामंडळाच्या अनुसूचित जातीच्या लाभार्थींसाठी वापरण्यात येईल. जेणेकरून मागास, दुर्बल घटकांना उत्पन्नाची साधने उपलब्ध होऊन त्यांची सर्वांगीण प्रगती होईल, असा विश्वास श्री. श्रीमाळी यांनी व्यक्त केला.
चर्चासत्राच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. समाजातील मागास, दुर्बल घटकांसाठी महाप्रित राबवित असलेल्या प्रकल्पांबाबत प्रशंसा करून त्यांनी समाधान व्यक्त केले. ‘महाप्रित’च्या या कार्यामुळे समाजातील मागासवर्गीयांची प्रगती व विकास होण्यास मोठा हातभार लागेल, असे सांगून त्यांनी चर्चासत्राला शुभेच्छा दिल्या.
उद्योजक व गुंतवणूक संस्था यांनीही, ‘महाप्रित’ने एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी मालंडकर यांनी केले. आभार महाप्रितचे कार्यकारी संचालक श्री प्रशांत गेडाम यांनी मानले.