दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहरासह तालुक्यामध्ये चायना मांजाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. यामुळे विविध पशू व पक्ष्यांना इजा झाल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. आगामी काळामध्ये चायनीज मांजामुळे कोणत्याही पशूपक्ष्यांना इजा झाल्याची घटना जर निदर्शनास आली, तर त्यांच्यावर वनविभागाच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा फलटणचे नियत वनाधिकारी राहुल निकम यांनी दिला.
फलटण येथील मुधोजी हायस्कूलच्या प्रांगणातून नेचर्स अँड वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन, गोविंद फौंडेशन व फलटण वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने चायनीज मांजाच्या विरोधात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी वनाधिकारी राहुल निकम बोलत होते. यावेळी गोविंद फौंडेशनच्या वतीने प्रा. सुधीर इंगळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
श्रावण महिन्यामध्ये पहिल्यापासून विविध सणांचे आयोजन हे आपल्या संस्कृतीनुसार केलेले आहे. यामध्ये नागपंचमी हा सण आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो. नागपंचमी दिवशी पतंग उडवण्याची परंपरा कधी व केव्हा चालू झाली व का चालू झाली, हे नेमकेपणाने कोणीही सांगू शकणार नाही. नागपंचमी दिवशी आपल्या परिसरामध्ये असलेल्या सर्वच जीवांचे संवर्धन करण्यासाठी आपण काम केले पाहिजे. आपल्या संस्कृतीनुसार ‘जगा व जगू द्या’, हा मंत्र लक्षात ठेवून आपण सर्वच सण साजरे केले पाहिजेत, असे मत गोविंद फौंडेशनच्या वतीने प्रा. सुधीर इंगळे यांनी व्यक्त केले.