स्थैर्य, सातारा, दि.१२: फ्लॅटसाठी घेतलेल्या 11.40 लाख कर्जापैकी 2 लाख 36 हजार कर्जाची परतफेड न करता बँकेच्या परवानगीशिवाय दस्त रद्द केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी गृह फायनान्स (बंधन बँक)चे अधिकारी निशिकांत संकपाळ यांनी कर्ज घेणारे विक्रांत बाळकृष्ण दुबळे, शशिकला बाळकृष्ण दुबळे दोघे रा. चिपळुणकर बागे सातारा आणि आर्या डेव्हलपर्स संस्थेचे मालक दिग्विजय आनंदराव गायकवाड, विद्या दिग्विजय गायकवाड दोघे रा. कोलाबा, मुंबई यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबत निशिकांत संकपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 9 ऑक्टोबर 2017 रोजी संबधित बँकेत विक्रांत बाळकृष्ण दुबळे व शशिकला बाळकृष्ण दुबळे हे दोघे गृह कर्ज काढण्यासाठी आले होते. त्यांना गृहकर्ज काढताना सर्व अटी व शर्ती समजावून सांगितल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांनी दि. 31 ऑक्टोबर 2017 रोजी कर्जकरार केला. कर्ज करार म्हणुन विक्रांत दुबळे व शशिकला दुबळे यांनी साठेकरारपत्र दस्त क्र. 2618/2017 दि. 05/06/2017 मुळ दस्त बँकेकडे तारण म्हणून ठेवले. त्याप्रमाणे विक्रांत दुबळे व शशिकला दुबळे यांना 11 लाख 40 हजार कर्ज मंजुर करून दिले व तेवढी रक्कम आर्या डेव्हलपर्सचे मालक दिग्विजय आनंदराव गायकवाड व विद्या दिग्विजय गायकवाड यांच्या आय.डी.बी.आय बँक खात्यात जमा केली.
यानंतर विक्रांत दुबळे व शशिकला दुबळे यांनी सलग पाच महिन्यांचे हप्ते चेक/डीडी द्वारे बँकेत जमा केले. त्यानंतर एप्रिल 2018 मध्ये विक्रांत दुबळे व शशिकला दुबळे हे हफ्ते देण्याकरिता आले नाही म्हणुन फिर्यादी यांनी विक्रांत दुबळे व शशिकला दुबळे यांची भेट घेतली व त्यांना हफ्ते का भरले नाही म्हणून विचारणा केली व हफ्ते भरण्याच्या सुचना दिल्या. त्यावर विक्रांत दुबळे यांनी त्यांचा मिठाई बनवण्याचा व्यवसाय बंद झाल्यामुळे हफ्ते भरता येणार नाहीत, असे सांगितले. त्यावर संकपाळ यांनी हफ्ते भरता येणार नसतील तर बँकेला पुढील कायदेशीर कार्यवाही करावी लागेल, असे सांगितले.
त्यानंतर फिर्यादी संकपाळ यांनी आर्या डेव्हलपर्स संस्थेचे मालक दिग्वीजय आनंदराव गायकवाड व विद्या दिग्वीजय गायकवाड यांचे ऑफिस व कर्ज वाटप केलेले व बँकेचे मिळकतीचे ठिकाण सीटी सर्वे नं. 486, वृंदावन गृह प्रकल्प नंदीनी बिल्डींग तळमजल्यावरील फ्लॅट नं. 104 मंगळवार पेठ सातारा येथे जावून कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दिग्वीजय गायकवाड त्याठिकाणी आले. त्यावेळी फिर्यादीने सर्व हकिकत सांगून कायदेशिर कारवाई करत असल्याचे सांगितले. त्यावर दिग्वीजय गायकवाड यांनी फिर्यादी संकपाह आणि त्यांचे सहकारी सुभाष मदने रा.कोरेगाव यांना दमदाटी केली व लोक बोलावून मारहाण करण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी काहीन बोलता तेथुन निघून गेले.
त्यानंतर संबंधित मिळकतीवर कायदेशीर नोटीसा देवुन कारवाई करण्यास सुरू केले. सर्व प्रथम वकिल अकबर शेख यांच्याद्वारे मिळकतीचा ‘शोध अहवाल’ घेण्याची विनंती केली. त्यानंतर दि. 08 ऑक्टोबर /10/2019 रोजी अॅड. अकबर शेख यांच्या शोध अहवाल घेवून सांगितले की, विक्रांत दुबळे व शशिकला दुबळे आणि आर्या डेव्हलपर्स संस्थेचे मालक दिग्वीजय आनंदराव गायकवाड व विद्या दिग्वीजय गायकवाड यांनी संगनमताने दि. 05 ऑगस्ट 2018 रोजी बँकेला तारण म्हणुन दिलेले दस्त साठेखत गृह फायनान्स लि (बंधन बँक)ची कोणतीही परवानगी न घेता तसेच कर्ज परतफेड न करता दस्त क्र. 5314/2018 दि. 05/10/2018 रद्द केलेला आहे.
विक्रांत दुबळे, शशिकला दुबळे यांनी फ्लॅटसाठी संबंधित बँकेकडून घेतलेल्या 11 लाख 40 हजार कर्जाची व्याजासह रक्कम 13 लाख 76 हजार आहे. त्यापैकी आर्या डेव्हलपर्सचे दिग्विजय गायकवाड व विद्या गायकवाड यांनी डीडीने दि. 14 ऑगस्ट 2019 रोजी 11 लाख 40 हजार बंधन बँकेत जमा केले. परंतु, उर्वरीत 2 लाख 36 हजार रुपये विक्रांत दुबळे शशिकला दुबळे दिग्विजय गायकवाड व विद्या दिग्विजय गायकवाड दोन्ही रा . 130/4 , कोलाबा पोलीस काँर्टर वी.इ.एस.टी.रोड कोलाबा , मुंबई यांनी अद्यापपर्यंत न भरता गृह फायनान्स लि . ( बंधन बँक लि , शाखा सातारा ) यांची फसवणुक केली. दरम्यानच्या कालावधीत त्यांचेकडुन कर्जाची रक्कम मागणी करून ते देण्यास नकार देत असल्यामुळे फिर्यादी यांनी शाहुपूरी पोलीस स्टेशन सातारा येथे तक्रार दिली. त्यानुसार कर्ज घेवून रक्कम पूर्ण परतफेड झाली नसताना आपसात संगनमत करून फ्लॅटचा दस्त परवानगीशिवाय परस्पर रद्द करून 2 लाख 36 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.