कोरेगाव, दि. २६ : आसरे, ता.कोरेगाव येथील नवलाई देवी मंदिरासमोर असलेल्या मैदानातून १४ वर्षांचा रोहन परशुराम पवार या मुलाला शुक्रवार दि. २४ जुलै रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी वडील परशुराम पवार यांनी तक्रार दिली असून, कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की रोहन पवार हा १४ वर्षांचा असून, तो कोरेगाव येथील सरस्वती विद्यालयात इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे वडील परशुराम पवार हे मोल मजुरी करतात. शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास तो नवलाई देवी मंदिरासमोर असलेल्या मैदानात मित्रासमवेत खेळत होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने, पवार कुटुंबीय व मित्रमंडळींनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.
याप्रकरणी पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार केशव फरांदे तपास करत आहेत.