स्थैर्य, सातारा, दि.११: चुकीचा नंबर लावून वाहनाचा वापर केल्याप्रकरणी काल अनिल कस्तुरे याच्या काल गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी आणखी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. राहुल चंद्रकांत माने निशिकांत सुनिल पिसाळ दोन्ही रा.रघुनाथ पुरा पेठ करंजे सातारा अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, सातारा शहरात वाहनास (एमएच 11 – सीसी – 8887) हा चुकीचा नंबर लावुन दोन सुझुकी अॅक्सेस वाहन चालक गाडी वापरत असल्याचे आढळुन आले. हा नंबर आर.टी.ओ. ऑफिस कडील नोंदी नुसार हिरो होंडा स्प्लेंडर गाडीचा आहे. ही गाडी श्रीधर रामदास जगदाळे रा. कुमठे, ता. कोरेगाव यांच्या मालकीची आहे. त्यांच्या वाहनावर अकारण दंडाची आकारणी होत असल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे.
चुकीचा नंबर लावून वाहनांचा वापर केल्याप्रकरणी सुझुकी अॅक्सेस वाहन चालक अनिल कस्तुरे रा. करंजे ता.जि.सातारा याच्याविरोधात शाहुपूरी पोलीस ठाणे येथे तर सुझुकी अॅक्सेस वाहन चालक राहुल चंद्रकांत माने, मालक निशिकांत सुनिल पिसाळ दोन्ही रा. रघुनाथपूरा पेठ करंजे यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहा.पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनानुसार सपोनि शेलार, सहा. पो. फौ. अनिल घनवडे, दशरथ कदम, पो.हे.कॉ. सुरेश शिंदे, विजय शिंगटे, पो. ना. अरुण पाटील, मनोज मदने, संदीप वाघमारे, पो. कॉ. आनंदराव भोसले यांच्या पथकाने केली आहे.
फॅन्सी नंबरप्लेटविरोधात आता विशेष मोहीम
वाहन चालकांकडुन वाहनांस फॅन्सी नंबरप्लेट तसेच विहीत नमुन्यातील नंबरप्लेट न लावण्याचे प्रमाण वाढले आहे. ई-चलान मशीनव्दारे कारवाई करताना गाडीच्या नंबरचे आकलन व्यवस्थीत होत नसल्याने दुसर्यांच्या गाडीवर कारवाई होवू लागली आहे. वाहनांच्या नंबर प्लेटबाबत वाहन धारकांनी सजग होणे आवश्यक आहे. यापुढे विहीत नमुनामध्ये नंबर नसणे तसेच चुकीचा नंबर व वाहतूक नियमांचे उल्लंघण करणे असे प्रकार करणार्याविरोधात विशेष मोहिम राबवून तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहा.पो.निरीक्षक, व्ही. ए. शेलार यांनी दिली आहे.