दैनिक स्थैर्य | दि. ३ एप्रिल २०२३ | फलटण | भिलकटी (तालुका फलटण) गावच्या हद्दीत गोठ्यामध्ये तीन जर्सी गाईंची वासरे व एका पिकअप गाडीमध्ये ३ जर्सी गाईंची वासरे व एक जर्सी गाई या गोवंशीय प्राण्यांचा दाटीवाटीने डांबून छळ केल्याप्रकरणी तिघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल दत्ताजीराव खराडे यांनी फिर्याद दिली आहे. यावेळी पोलिसांनी ४ लाख रुपये किमतीची पिकअप गाडी (क्रमांक एमएच ४६ ए ०६७७), ९ हजार रुपये किमतीची तीन जर्सी गाईंची वासरे (वय अंदाजे एक दिवस ते ४० दिवस) व ५० हजार रुपये किमतीची एक पांढर्या राखाडी रंगाची जर्सी गाई असा एकूण ४ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी मोहम्मद शकीब कुरेशी, बिलाल कुरेशी (दोघेही रा. फलटण, तालुका फलटण व अजित सोपान खोपडे (वय ४२, राहणार माहूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ३ एप्रिल २०२३ रोजी रात्री १२.४० वाजता भिलकटी (तालुका फलटण) गावचे हद्दीत मोहम्मद शकीब कुरेशी, बिलाल कुरेशी (पूर्ण नाव माहीत नाही, दोघेही राहणार फलटण, तालुका फलटण) यांचे मालकीच्या गोठ्यामध्ये त्यांनी २ जर्सी जातीचे लहान खोंडे दाटीवाटीने बेकायदेशीर डांबून ठेऊन त्यांना खाण्या-पिण्याची कोणतीही सोय न करता गोठ्यात डांबून ठेवली व शेडमध्ये महिंद्रा कंपनीचा छोटा हत्ती पिकअप गाडी (क्रमांक एमएच ४६ ए ०६७७) दिसून आली. त्यात पाहणी केली असता त्यामध्ये १ एक पांढर्या रंगाची जर्सी गाय, एक काळ्या-पांढर्या रंगाची गाय, १ जर्सी जातीचे लहान खोड दिसून आले. सदर गाडी ड्रायव्हरला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अजित सोपान खोपडे (वय ४२, राहणार माहुर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) असे सांगितले म्हणून त्याचेविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी वरील तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस फौजदार यादव अधिक तपास करत आहेत.