दैनिक स्थैर्य । दि.२० मार्च २०२२ । सातारा । वडिलांनी जामिनासाठी भरलेले पैसे परत मिळावे, या कारणासाठी पाडळी (ता.सातारा) येथून राहत्या घरातून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी येथीलच युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. शिवेंद्र राजेंद्र ढाणे (मूळ रा.पाडळी, ता.सातारा, हल्ली रा.सातारा) असे या युवकाचे नाव आहे. बोरगाव पोलिसांनी चार तासातच शिताफीने अटक केली. त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर अल्पवयीन मुलगा हा आईसोबत पाडळी येथे रहावयास आहे. या मुलाच्या भावावर सन २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी गावातीलच शिवेंद्र राजेंद्र ढाणे याचे वडील जामीन झाले होते.त्यांनी जामिनासाठी ५ हजार रुपये भरले होते.वडिलांनी जामिनासाठी भरलेल्या ५ हजार रुपयांऐवजी ९ हजार रुपये परत द्यावे यासाठी शिवेंद्र ढाणे हा या कुटुंबाला वारंवार धमकी देत होता.
शुक्रवारी सकाळी मुलाची आई रानात गेली होती. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शिवेंद्र ढाणे हा त्यांच्या घरी आला व त्याने पुन्हा पैशाची मागणी केली. यावेळी त्याने मुलाच्या आईला फोन करून ‘जामिनासाठी भरलेले पैसे परत दे नाहीतर तुझ्या मुलाला उचलून घेऊन जाऊन त्याला जीवे ठार मारीन अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून त्याला सातारा येथील शिवराज पेट्रोल पंपालगत असलेल्या डोंगरातील झाडीत घेऊन गेला.तेथे त्याला त्याने मारहाण केली.त्यानंतर शिवेंद्र ढाणे याने त्याला कारंजे (सातारा) येथे आणले.तेथेही त्याला जबर मारहाण करून त्याच्या आईकडे फोनवरून पुन्हा पैशाची मागणी केली.
यावेळी सायंकाळी उशिरा शिवेंद्र ढाणे याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत अल्पवयीन मुलाने शिवराज पेट्रोल पंप गाठले.तेथून त्याने आपल्या चुलत भावाला फोन करून सर्व घटना सांगितली.चुलत भावाने तात्काळ त्याला तेथून घेऊन बोरगाव पोलीस ठाणे गाठले व पोलिसांना सर्व घटना सांगितली. रात्री उशिरा याप्रकरणी शिवेंद्र ढाणे याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
घटनेचे गांभीर्य ओळखून सपोनि. डॉ.सागर वाघ यांनी पोलीस जवान दादा स्वामी व प्रशांत मोरे यांना संशयिताला तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. केवळ चार तासातच पोलीस जवानदादा स्वामी व प्रशांत मोरे यांनी खिंडवाडी(ता.सातारा) येथून राहत्या घरातून संशयित शिवेंद्र ढाणे याला अटक केली.या घटनेचा पुढील तपास सपोनि डॉ.सागर वाघ करत आहेत.