दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२२ । सातारा । बोरगाव (ता.सातारा) येथील शेतजमिनीलगतचा शासकीय ओढा संगनमताने मुजवून त्याचे पात्र बदलले व वहिवाटीचा रस्ता अडवल्यासंदर्भात बोरगाव पोलीस ठाण्यात के पल्प पेपर मिलच्या दोघांसह अन्य दोन शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान भानुदास साळुंखे, दिनेश भानुदास साळुंखे (दोघे रा.बोरगाव.ता.सातारा) यांच्यासह के पल्प पेपर मिलचे नीरज चंद्रा व प्रशासकीय अधिकारी कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीरेंद्र वसंत काटकर (रा. वाढे, ता. सातारा) यांनी याबाबतची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव शेतीशाळेजवळ कोल्हापूर येथील विकास वसंतराव पाटील यांची गट न.४६२ शेतजमीन आहे. या शेतीची देखभाल विरेंद्र काटकर गेल्या चार वर्षांपासून करत आहेत.
एप्रिल २०२२ ते जून २०२२ या कालावधीत बोरगाव येथील रहिवाशी समाधान साळुंखे, दिनेश साळुंखे यांनी बोरगाव शेतीशाळेजवळील के पल्प पेपर मिलचे प्रशासकीय अधिकारी कदम व पेपर मिलचे नीरज चंद्रा यांच्या संगनमताने शेतीशाळेकडून येणाऱ्या व गट नं. ४६६ मधून मधोमध वाहत जाणाऱ्या शासकीय ओढ्याचे स्रोत नियमबाह्यपणे व बेकायदेशीरपणे बदलून वंशपरंपरागत चालत आलेला ओढा बुजवून त्याचे स्रोत गट नं.४६२ च्या कंपाउंडला घासून घेऊन नुकसान केले. तसेच या ओढ्याचे स्रोत गट नं.४६२ मध्ये वंशपरंपरागत असलेल्या जाण्या-येण्याच्या रस्त्यात घालून रस्त्याचे नुकसान करून वहिवाटीस अडथळा अडथळा आणल्याची फिर्याद वीरेंद्र काटकर यांनी दाखल केली आहे. या फिर्यादीवरून पोलिसानी समाधान साळुंखे,दिनेश साळुंखे,के पल्प पेपर मिलचे अधिकारी कदम व नीरज चंद्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.