
दैनिक स्थैर्य । दि. २७ जून २०२२ । खंडाळा । खंडाळा तालुक्यातील गुठाळे याठिकाणी रिक्षाचालकाला घर बांधायचे असेल तर दिड लाख रुपये दयावे लागतील अशी खंडणी मागितल्याप्रकरणी एकाविरुध्द शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी चंद्रशेखर नारायण महांगरे (रा.गुठाळे ता.खंडाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या खंडणीखोराचे नाव आहे. याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,सध्या पुणे येथे रिक्षाचालक म्हणून वास्तव्यास असलेले संजय निवृत्ती महांगरे (वय 48) यांचे गुठाळे ता.खंडाळा येथे घर आहे.सदर ठिकाणी संजय महांगरे यांच्या आजोबांनी सन 1968 मध्ये घर बांधलेले होते.यावेळी हे घर संजय महांगरे यांच्या वडिलांच्या वाटणीला आले आहे.दरम्यान,घर मोडकळीस आल्याने संजय महांगरे यांनी वडिलांच्या संमतीने 18 जानेवारी 2022 रोजी घर पाडण्यास सुरवात केली.यावेळी घर पाडून झाल्यानंतर घराशेजारी असणाऱ्या चंद्रशेखर महांगरे याने दुरध्वनीद्वारे संजय महांगरे यांना बोलावून घेत तुझ्या घराचे जागेमध्ये माझी जागा येत आहे असे सांगून आर्थिक मागणी केली.यावेळी संजय महांगरे यांनी नकार दिला. दरम्यान,संजय महांगरे यांनी विविध नागरिकांच्या माध्यमातून समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतू दिड लाख रुपये खंडणी दिल्याशिवाय घराचे काम करु देणार नाही अशी दमदाटी व शिवीगाळ केली होती.त्यामुळे याबाबतची तक्रार संजय मंहागरे यांनी खंडाळा तहसिलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.यावेळी 4 मे 2022 रोजी संजय मंहागरे यांनी घराचे काम चालू केल्यानंतर चंद्रशेखर मंहागरे याने घराचे काम थांबविलेबाबत शिरवळ पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती.त्यामुळे चंद्रशेखर मंहागरे याने तुझे घर माझ्या जागेत येत आहे,तूला घर बांधायचे असेल तर तू मला दिड लाख रुपये खंडणी दे असे म्हणून शिवीगाळ करुन दमदाटी केल्याबाबतची तक्रार संजय मंहागरे यांनी दिली असून याप्रकरणी चंद्रशेखर मंहागरे याच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस अंमलदार आप्पासाहेब कोलवडकर हे करीत आहे.