
दैनिक स्थैर्य । दि. ०६ ऑगस्ट २०२२ । सातारा । शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ऍप्पे रिक्षा बॅटरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत ३५ हजार रुपये किमतीच्या बॅटरीसह एक दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळवले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा येथील गेंडामाळ परिसरात असणाऱ्या झोपडपट्टीतून कैलास भगवान वडलिक यांच्या ऍप्पेरिक्षाची बॅटरी चोरीला गेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तपास करीत असताना दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास बुधवार नाका ते करंजे नाका जोडणाऱ्या रस्त्यावर दोन अल्पवयीन मुले त्यांच्याकडील दुचाकीवरून पोत्यामध्ये काहीतरी घेऊन जात असताना दिसली. त्यांचा संशय आल्याने पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा केला मात्र ते तसेच पुढे जाऊ लागल्याने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील पोत्याची तपासणी केली असता त्यामध्ये ऍप्पेरिक्षाची बॅटरी आढळून आली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गेंडामाळ परिसरात असणाऱ्या झोपडपट्टीतील ऍप्पेरिक्षाच्या बॅटरीची चोरी केल्याची कबुली दिली. त्या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३५ हजार रुपये किमतीची एक दुचाकी व बॅटरी हस्तगत केली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सय्यद पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, लैलेश फडतरे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील सावंत यांनी सहभाग घेतला.