दैनिक स्थैर्य | दि. १२ नोव्हेंबर २०२१ | कोळकी | फलटणचे उपनगर सनजले जाणार्या कोळकीमध्ये राहणार्या पेशाने बातमीदार व इन्शुरन्स ॲडव्हाईजर असणार्या संजय जामदार हे नर्मदा परिक्रमा सायकलने पूर्ण करण्यासाठी मार्गस्थ झालेले आहेत. त्यांच्या ह्या अनोख्या सायकल परिक्रमेचा घेतलेला थोडक्यात आढावा…..
छंद! मनुष्य प्राण्याच्या जीवनातला एक अविभाज्य घटक. या छंदापायी ‘छांदिष्ट’ काय काय खेळ खेळील, याचा काहीच नेम नाही बुवा! ‘संजय जामदार’ असेच एक अवलिया. वय साधारण पन्नाशीच्या घरात. पेशाने सकाळ वृत्तपत्र समुहाचे बातमीदार त्यासोबतच एलआयसी व स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे ॲडव्हाईजर. पत्रकारिता व इन्शुरन्स ॲडव्हाईजर अशी तारेवरची कसरत करता – करताच त्यांनी अध्यात्माची कास चांगलीच जोपासलीय आणि मोठया हिमतीने पूर्णत्वास नेत आहेत.
गेल्या काही वर्षांपुर्वी गाडीने नर्मदा परिक्रमा पुर्ण केल्यानंतर त्यानंतरच्या काही वर्षांत संजय जामदार यांनी पायी नर्मदा परिक्रमा पुर्ण केलेली आहे. आता पुन्हा नर्मदा परिक्रमा करायची पण ती करायची तरी कशी ? असे अनेक प्रश्न गेले काही महिने त्यांच्या मनामध्ये घोळत असतील. ही सफर गेल्या सफरीप्रमाणे एकट्यानेच करण्याची जिद्दही बाळगली; कारण अशा अवघड सफरीत साथ देण्यासाठी तसाच जिद्दी जोडीदार लाभणं जरा दूरच !
फलटण शहराचे उपनगर समजले जाणार्या कोळकी गावामधुन निघण्यापासून परतण्यापर्यंतचा मार्ग संजय जामदार यांनी आखला. त्यामधले टप्पे, विश्रांतीच्या जागा आधीच मनामध्ये ठरवल्या गेल्या. प्रवासातलं आवश्यक सामान, कमीत कमी, लाभदायक आणि सुयोग्य असेल, असंच निवडलं. हलके आणि आरामदायी कपडे, वजनात कमी पण सकस अन्नपदार्थाची यादी तयार झाली.
बरेसचे प्रयत्न करूनही चांगल्या प्रतीच्या सायकलची सोय मात्र काही केल्या होईना. अखेरीस संजय जामदार यांनी फलटण येथील सायकल दुकानातुन एक नवी कोरी तशी बघितली तर साधी परंतू एकदम टिकावू अशी सायकल विकत घेतली. मोहिमेसाठी अत्यावश्यक सायकल आणि ऑफिसमधून अत्यावश्यक रजा यांचा गुंता झटपट सुटला. आज १२ नोव्हेंबर २०२१ रोजी आपले कुटुंबीय, आप्तेष्ट व मित्रपरिवाराचा निरोप घेतला व कोळकी येथील मारूती मंदीरापासुन सुरुवात झाली एका महत्त्वाकांक्षी सायकल सफरीला.
जिद्दी, ध्येयवादी व अध्यात्मिक असे असलेल्या संजय जामदार यांची ही सायकल वरील नर्मदा परिक्रमा निर्विघ्न अशी पार पडणार आहे, यात कोणाच्याही मनात कसलीही शंका असण्याचे कारण नाही.