
स्थैर्य, फलटण, दि. ३० जानेवारी : सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर कोळकी जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जयकुमार शिंदे तसेच पंचायत समिती गणाचे उमेदवार विकास नाळे यांनी आज गिरवी गावात ‘हाऊस टू हाऊस’ प्रचार करून प्रचाराचा धडाका उडवून दिला. यावेळी ग्रामस्थांनी दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता, कोळकी गटात आता परिवर्तनाचे वारे वाहू लागल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली हा प्रचार दौरा काढण्यात आला होता. गिरवी गावातील प्रत्येक गल्लीत आणि घराघरात जाऊन जयकुमार शिंदे व विकास नाळे यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी शेकडो नागरिकांनी स्वतःहून बाहेर पडून या दोन्ही उमेदवारांचे जंगी स्वागत केले.
जयकुमार शिंदेंचा ७ वर्षांचा दांडगा अनुभव आणि विश्वास
प्रचारादरम्यान बोलताना ग्रामस्थांनी जयकुमार शिंदे यांच्या सात वर्षांच्या जिल्हा सरचिटणीस पदाच्या कार्यकाळाचे कौतुक केले. ‘हर घर तिरंगा’ अभियान असो वा ‘आत्मनिर्भर भारत’ योजना, प्रत्येक सरकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम शिंदे यांनी केले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका आणि श्रीराम बझारच्या माध्यमातून केलेले सहकार क्षेत्रातील कार्य यामुळे गिरवीतील सुज्ञ मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे.
विकास नाळेंच्या कामाची ‘क्रेझ’ कायम
दुसरीकडे, पंचायत समितीचे उमेदवार विकास नाळे यांच्याबद्दल मतदारांमध्ये विशेष आत्मियता पाहायला मिळाली. कोळकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि विद्यमान सदस्य म्हणून त्यांनी १५-२० वर्षे केलेल्या मूलभूत सोयी-सुविधांच्या कामांची पावती आज गिरवीकरांनी दिली. “प्रशासकीय अधिकाऱ्यांशी भांडून जनतेची कामे करून घेणारा नेता” अशी ओळख असलेल्या विकास नाळे यांच्या उमेदवारीमुळे भाजपाची बाजू अधिक भक्कम झाली आहे.

विरोधकांचे धाबे दणाणले
कोळकी गटात भाजपा विरुद्ध राजे गट प्रणित शिवसेना असा थेट सामना रंगणार आहे. जयकुमार शिंदे यांच्यासमोर सह्याद्री चिमणराव कदम, तर विकास नाळे यांच्यासमोर डॉ. अशोक नाळे यांचे आव्हान असले, तरी आजच्या गिरवीतील प्रतिसादाने विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. खासदार गटाच्या या दोन शिलेदारांनी मोठी आघाडी घेतल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
यावेळी गिरवी गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “गावचा विकास आणि तालुक्याची प्रगती केवळ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालीच शक्य आहे,” असा विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांनी जयकुमार शिंदे व विकास नाळे यांना भरघोस मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार केला आहे.
