दैनिक स्थैर्य । दि. १० ऑगस्ट २०२२ । सातारा । सोमवारी पहाटे शाहूपुरीपासून माळवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठे वडाचे झाड कोसळले आहे. यामुळे येथील वाहतूक सुमारे 5 तास ठप्प झाली असून झाड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
शाहूपुरी परिसरात रविवारी सकाळपासून पुन्हा दमदार पावसास सुरुवात झाली आहे. वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे शाहूपुरी दरम्यान आदर्श कॉलनीनजीक मुख्य रस्त्यावरच वडाचे झाड कोसळून आडवे झाले आहे. शाहूपुरीपासून कोंडवे खिंडीतून कण्हेर परिसरात जाण्यासाठी हा एकमेव मुख्य रस्ता आहे. यामुळे या रस्त्यावरून मोठी वर्दळ होत असते. या रस्त्यावर वडाचे झाड कोसळून येथील वाहतूक ठप्प झाली आहे. हे झाड विजेच्या तारावर पडल्याने नजीकचे दोन विजेचे खांबही भुईसपाट झालेले आहेत. यामुळे पहाटेपासून कोंडवे व आंबेदरे परिसरातील वीज गायब झाली आहे. संबंधित यंत्रणेकडून झाड काढण्याचे काम दोन तासापासून युद्ध पातळीवर सुरू आहे. अखेर सकाळी 11 वा.वडाचे झाड हटवून या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. तसेच येथील विजेचे खांब व तारांचीही दुरुस्ती महावितरणकडून करण्यात येत असून सायंकाळपर्यंत वीज दुरुस्ती होईल,अशी माहिती महावितरण विभागाकडून यावेळी देण्यात आली.