
स्थैर्य, पुणे दि. 22 डिसेंबर : सातारा या ऐतिहासिक नगरीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात येणार्या ग्रंथदिंडी व शोभायात्रेत भारतीय संत परंपरेपासून समाज सुधारकांचे कार्य, भारतीय संस्कृती, लोकसाहित्य तसेच सातार्यातील शिक्षण, पर्यटन आणि साहित्य परंपरांचे चित्रण दिसून येणार आहे.
तब्बल 32 वर्षांनंतर शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशनला मिळाला आहे. सारस्वतांच्या या उत्सवात सातारा जिल्ह्याची ओळख दर्शविणारे विविध उपक्रम राबविण्यात येणात आहेत. या निमित्ताने दि. 1 जानेवारी 2026 रोजी शहरातील गांधी मैदान येथून संमेलनस्थळापर्यंत म्हणजेच शाहू स्टेडियमपर्यंत भव्य ग्रंथदिंडी व शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सातारा जिल्ह्यातील एकूण 55 शाळा व महाविद्यालयांचे चित्ररथ समाविष्ट करण्यात येणार आहेत. तसेच शिक्षण विभागातून प्रत्येक तालुक्याचा एका या प्रमाणे 11 व जिल्हा परिषदेचा एक चित्ररथ असणार आहे. या चित्ररथांच्या माध्यमातून मराठी संत साहित्यातील सुविचार तसेच मराठी सारस्वतांनी मराठी भाषेच्या योगदानासाठी केलेल्या साहित्य निर्मितीचे दर्शन सातारकरांसह संमेलनासाठी येणार्या जगभरातील साहित्यप्रेमींना घडणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.
मराठी मातीचा अस्सलपणा जोपासताना या ग्रंथदिंडी व शोभायात्रेत पालखी, अबदार्या, छत्र्या, बग्गी, बैलगाड्या, घोडेस्वार यांच्यासह सनई-चौघड्यांचा नाद निनादणार आहे. झांज, लेझिम, बँड पथकासह एन. सी. सी. पथकाचाही यात सहभाग असणार आहे. या वेळी महाराष्ट्रातील लोककलांचे दर्शनही घडणार आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे सुखद दर्शन घडविणार्या ग्रंथदिंडी व शोभायात्रेत संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील, मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी तसेच स्वागताध्यक्ष श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले सहभागी होणार आहेत.
या ग्रंथदिंडीत व शोभायात्रेत रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, डेक्कन ए्ज्युकेश सोसायटी, सातारा एज्युकेशन सोसायटी तसेच श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल सातारा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले ती शाळा, यशोदा शिक्षण संस्था यांच्यासह विविध मान्यवर शिक्षण संस्थेतील सुमारे तीन हजार विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार आहेत.
चित्ररथांना पारितोषिक..
ग्रंथदिंडी व चित्रराथत सहभागी कलाकार, शिक्षक, संस्था, शाळा यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार असून उत्कृष्ट 25 चित्ररथांना तसेच 11 संचलनास विशेष पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाणार आहे.
साहित्य परंपरेचे समग्र दर्शन
ग्रंथदिंडी, चित्ररथ व शोभायात्रेत सातारा जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत. सारस्वतांचा हा सोहळा दिमाखदार व्हावा आणि साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सुसंस्कृत समाज घडावा तसेच हे संमेलन अधिक देखणे, रंजक व प्रबोधनात्मक घडावे या करिता भारतीय संत साहित्यातील मौल्यवान विचार, अभंग, ओवी, भारूड यातून जनतेला दिलेला संदेश, शाहिरांची परंपरा, दलित साहित्य चळवळ, स्वातंत्र्य आंदोलनातील साहित्य, समाज सुधारकांचे कार्य, भारतीय संस्कृती, लोकसाहित्य, सातार्यातील साहित्य परंपरा, पर्यटन स्थळे, शिक्षण परंपरा आणि आधुनिक साहित्याचेही समग्र दर्शन घडणार आहे.
चौका-चौकात होणार स्वागत
ज्या मार्गाने ग्रंथदिंडी व शोभायात्रा जाईल त्या रस्तयावरील मुख्य चौकांमध्ये यात सहभागी होणार्या साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी विविध शाळांचे बँड व झांजपथक असणार आहे.
रुग्णवाहिकेची सुविधा : ग्रंथदिंडी व शोभायात्रेत विद्यार्थ्यांसह असंख्य साहित्य प्रेमींचा सहभाग आसल्याने काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रुग्णवाहिकेची सुविधा करण्यात आली आहे.
स्वच्छतेसाठी कर्मचारी : ग्रंथदिंडी व शोभायात्रेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले जाणार आहे. कचर्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी तत्पर सेवा पुरविणार असल्याने ग्रंथदिंडीनंतरही सातार्यातील रस्ते चकाचक राहणार आहेत.
ग्रंथदिंडी व शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, ग्रंथदिंडी व शोभायात्रा समितीचे मुख्य समन्वयक दत्तात्रय मोहिते, समिती सदस्य राजकुमार निकम, रवींद्र खंदारे, संमती देशमाने, सचिन सावंत, किरण कदम, उमेश पाटील, अॅड. अनिरुद्ध जोशी, राजू गोडसे, राजेश भोसले, अनंत जोशी यांच्यासह जिल्हा प्रशासन कार्यरत आहेत.

