31 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 161 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्थैर्य, सातारा दि. 4 : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे आज तपासणी करण्यात आलेल्या 16 नमुन्यांपैकी खटाव तालुक्यातील वडगाव येथील 75 वर्षीय पुरुष कोविड बाधित आला असून उर्वरित 15 नमुने निगेटिव्ह आले आहेत. तसेच काल 3 जून रोजी पाठविण्यात आलेल्या सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथील 16 जणांचे नमुनेही निगेटिव्ह आले आहेत. असे एकूण 31 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
161 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 23, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 28, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 14, ग्रामीण रुग्णालय, खंडाळा येथील 52, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 33 व रायगाव येथील 11 असे एकूण 161 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस., पुणे यांच्याकडे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात 579 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 254 रुग्ण बरे झाले आहेत. तर 301 रुग्णांवर उपचार सुरु असून 24 जणांचा मृत्यु झालेला आहे.