
साताऱ्यातील वंचित राहिलेल्या पाटण, वाई, कऱ्हाड, जावळी आणि कोरेगाव या ५ तालुक्यांना दुष्काळी उपाययोजनांचा लाभ देण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ३० सप्टेंबर : सातारा जिल्ह्यातील दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आलेल्या पाटण, वाई, कऱ्हाड, जावळी आणि कोरेगाव या पाच तालुक्यांमध्ये पावसाच्या मोठ्या खंडामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या सर्व तालुक्यांना दुष्काळी सवलती व मदतीचा लाभ देण्याची जोरदार मागणी केली आहे. यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
पावसाच्या खंडामुळे पिके करपली
जिल्ह्यातील पाटणसह उर्वरित तालुक्यांत पावसाने दिलेल्या दीर्घ विश्रांतीमुळे खरीप पिके वाळली आहेत. पाटण तालुक्यातील १४ पैकी ९ महसूल मंडळांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असून उर्वरित ५ मंडळांत पावसाचा खंड पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ पर्जन्यमानाच्या तांत्रिक आकड्यांवर न ठरवता पिकांवर झालेल्या प्रत्यक्ष परिणामांचा विचार करून या सर्व ५ तालुक्यांना दुष्काळी सवलती लागू कराव्यात, असे देसाई यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीचे आदेश
मंत्र्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दुष्काळी निकष व ‘ट्रिगर-३’ अंतर्गत या तालुक्यांची तपासणी करून मदतीचा मार्ग मोकळा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील या पाचही तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



