जिल्हा बँकेसाठी श्रीमंत संजीवराजे अन् दीपकरावांचा अर्ज; पण ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांकडून रणजितदादांना कोणता मिळाला ‘कानमंत्र’?

साताऱ्यात राजकीय घडामोडींना वेग

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत संजीवराजे निंबाळकर व दीपकराव चव्हाण यांचे अर्ज दाखल. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण भेटीमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २७ सप्टेंबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम आता संपूर्ण जिल्ह्यात जोरात वाजू लागले आहेत. निवडणूक जाहीर झाल्यापासूनच राजकीय वातावरण तापले असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी महत्त्वपूर्ण घडामोडी पाहायला मिळाल्या. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेनेचे फलटण तालुक्यातील नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. श्रीमंत संजीवराजे यांनी फलटण तालुका सोसायटी मतदारसंघातून, तर दीपकराव चव्हाण यांनी अनुसूचित जाती व जमाती मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीत शड्डू ठोकला आहे.

एकीकडे विरोधकांकडून अर्ज भरण्याची लगबग सुरू असताना, या निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष फलटण तालुक्याकडे लागले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सध्या फलटणमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निर्विवाद आणि एकहाती सत्ता आहे. फलटण नगरपरिषद, पंचायत समिती यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर रणजितदादांचेच निर्विवाद वर्चस्व आहे. एवढेच नव्हे तर, विधानसभेवर सुद्धा त्यांच्याच खंबीर नेतृत्वात आमदार सचिन पाटील हे निवडून गेले आहेत. सद्यस्थितीत ‘गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत’ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे राजकीय पारडे अतिशय जड असल्याने, आता जिल्हा बँकेच्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत ते नक्की कोणती रणनीती आखणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

या सर्व राजकीय धामधुमीत अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घडामोड मुंबईत पार पडली. एकीकडे साताऱ्यात विरोधक अर्ज भरत होते, तर दुसरीकडे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी विशेष बैठक घेतली. या उच्चस्तरीय आणि महत्त्वपूर्ण बैठकीला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे आणि जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीमुळे आता साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा बँकेच्या या अटीतटीच्या निवडणुकीसाठी रणजितदादांना नक्की कोणता ‘कानमंत्र’ दिला आहे? यावरच खलबते सुरू झाली आहेत. विरोधकांनी अर्ज दाखल करून आघाडी घेण्याचा प्रयत्न केला असला तरी, राज्याच्या प्रमुखांकडून मिळालेल्या या विशेष ‘कानमंत्रा’नंतर रणजितदादा आपली कोणती नवी राजकीय खेळी खेळणार आणि आपला उमेदवार कसा रिंगणात उतरवणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असून, आता रणजितदादांच्या पुढील ‘ॲक्शन प्लॅन’कडे संपूर्ण जिल्ह्याचे डोळे लागले आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!