
फलटण तालुक्यातील कोळकी येथे अनंत चतुर्दशीच्या रात्री जुन्या वादातून रोहन शिंदे या तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी संशयित सचिन हजारे याच्यावर फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २७ सप्टेंबर : फलटण तालुक्यातील कोळकी येथे गणेश विसर्जनाच्या (अनंत चतुर्दशी) रात्री एका तरुणावर जुन्या वादातून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात रोहन शिंदे (वय ३०) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एका संशयितावर फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रक्षाबंधनाच्या वादातून वार
फिर्यादीत नमूद केलेल्या माहितीनुसार, कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयासमोरील मैदानात २५ सप्टेंबरच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रोहन शिंदे हा आपल्या मित्रांसोबत थांबला होता. त्यावेळी तेथे आलेला संशयित सचिन किसन हजारे याने रक्षाबंधन सणाच्या दिवशी झालेल्या वादाचा राग मनात धरून रोहनला शिवीगाळ केली. तसेच ‘तुला आता जिवंत मारून टाकतो’ अशी धमकी देत पोटाच्या डाव्या बाजूला धारदार शस्त्राने वार केले.
उपचारासाठी रुग्णालयात दाखल
या अनपेक्षित हल्ल्यात रोहन शिंदे गंभीर जखमी झाल्याने त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी फलटण येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर रोहनची आई सुनीता शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सचिन हजारे याच्यावर फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.



