99 व्या साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्या उद्घाटन


स्थैर्य, सातारा, दि.17 ऑक्टोबर : सातायात मसाप, पुणे शाहुपुरी शाखा, मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातार्‍यात दि.1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 दरम्यान होणार आहे. या संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन शनिवार, दि. 18 ऑक्टोबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी 6 वाजता जनता बँकेच्या मुख्य कार्यालयातील तळमजल्यावर होणार असल्याची माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
सातार्‍यात तब्बल 32 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन वैशिष्टयपूर्ण आणि सातार्‍याच्या लौकिकाला साजेसे व्हावे यासाठी स्वागताध्यक्ष श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. या संमेलनासाठी मार्गदर्शन समिती, स्मरणिका संपादन समिती, ग्रंथदिंडी, शोभायात्रा समिती, साहित्यिक व ऐतिहासिक दालन समिती, कवी कट्टा आणि गझल कट्टा समिती जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे संमेलनाच्या बोधचिन्हाचेही अनावरण काही दिवसांपूर्वी पुणे येथे आणि लोकार्पण सातारा येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. संमेलनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याला साहित्यप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर म्हणजे शनिवारी प्रसिध्द लेखक, कवी, गीतकार, संगीतकार डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संमेलनाच्या इतिहासात प्रथमच तरुण आणि लोकप्रिय लेखकाला कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा मान देण्यात आला आहे. अध्यक्षस्थान संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले भूषवणार आहेत. खा. श्री.छ. उदयनराजे भोसले यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार असून प्रमुख पाहुणे म्हणून रोजगार हमी, फलोत्पादन आणि खार जमीन विकासमंत्री भरत गोगावले उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे कार्यालय सातारकरांची अर्थवाहिनी असलेल्या जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीतील तळमजल्यावर करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी साहित्यप्रेमींनी, सातारकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, स्वागत समिती सदस्य व कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.

संमेलनाचे कार्यालय आकर्षक

संमेलनाचे कार्यालय प्रशस्त असून आकर्षक विद्युत रोषणाई, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सातारा शहराचे संस्थापक आणि स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमा सातारा शहराच्या राजधानीपणावर प्रकाशझोत टाकत आहेत. युगप्रवर्तक कवी बा.सी.मर्ढेकर, कवी गिरीश शांता शेळके, कुसुमाग्रज यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या प्रतिमांनी कार्यालयाची साहित्यिक ओळख अधिक गडद केली आहे. आकर्षक बोधचिन्हही लक्ष वेधून घेत आहे. छायाचित्रातून कार्यालयाचे रुप सुंदर दिसत आहे. उत्तम अशा या कार्यालयाची निर्मिती केल्याबद्दल संयोजकांचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!