९६ टक्के गोवंशीय पशुधनाचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण पूर्ण


दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । राज्यात खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी पशुंचे लम्पी चर्मरोग प्रतिबंध लसीकरण केले असून, ९६ टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

श्री.सिंह म्हणाले की, राज्यामध्ये ऑक्टोबर अखेर ३२ जिल्ह्यांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित पशुधनापैकी एकूण ७८ हजार ३४१ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यात एकूण १ कोटी ४० लाखाच्यावर लसी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्यामधून एकूण १ कोटी ३३ लाखांवरील पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली, वाशिम, जालना, हिंगोली आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

रोगाची लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच उपचार सुरू केल्यास बहुतांश पशू उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे पशुपालकांनी वेळेवर पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुचा उपचार करण्याचे आवाहन आयुक्त श्री. सिंह यांनी केले आहे.

लम्पी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग असून, राज्यातील रोगाचा आलेख घटत आहे. हा रोग कीटकांपासून पसरणारा असून, गाई व बैलांपासून किंवा गाईच्या दुधापासून मानवामध्ये संक्रमित होऊ शकत नाही.


Back to top button
Don`t copy text!