स्थैर्य, सातारा, दि. 18 : हल्ली दीर्घायुषी व निरोगी जीवन म्हणजे एक कल्पनाच ठरत आहे. धकाधकीचे जीवनमान आणि प्रदुषित झालेले वातावरण यात आयुष्य किती जगता येईल व त्यातही निरोगी किती वर्षे जगतील याचा नेम नाही महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात मात्र मी अनेक अवलीये निरोगी व दीर्घायुषी पाहिले आहेत. आजही कोरोनाच्या भीतीदायक काळात तरुणांनी आदर्श घ्यावा असे चांदीची गदा पेलणारा 95 वर्षाचा मोहीचा अवलिया पै रामचंद्र भगत हे निर्व्यसनी आदर्शवादी आहेत
हे आहे मोही गावचे जुन्या काळातील नामवंत मल्ल पैलवान रामचंद्र भगत. आजच्या काळातील महाराष्ट्राचा तुफानी मल्ल किरण भगतचे आजोबा आहेत. आपल्या नातवाच्या कुस्त्याना यापूर्वी ही त्यांनी अनेक मैदानात लढताना पाहिले आहे. नव्हे किरणच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. किरणचे वडील पैलवान नारायण भगत हे सुद्धा मोठे नावाजलेले पैलवान. माण दुष्काळी परिस्थितीशी लढताना मुबंई येथे माथाडी कामगार, हमालीत काम करून किरणला घडवण्याचं दिव्यत्व पेललं दुसरा मुलगा दत्ता भगत भारतीय सेनादलात देशसेवा करतो आहे. दत्ता भाऊ यांचा चिरंजीव सार्थक सुद्धा आता मल्लविद्येचा श्रीगणेशा गिरवत आहे. कुस्तीची घराणेशाही कशी असते पहा. आजोबा, वडील, भाऊ सारेच्या सारे पैलवान हा किती मोठा वारसा लाभला आहे. भविष्यातील हिंदकेसरी ठरू पहाणाऱ्या सार्थकच्या समोर कुस्ती विद्यापीठच म्हणावे लागेल आयुष्यात हीच गोष्ट त्याच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. आज आपण 21व्या शतकात वावरत आधुनिक, शहरी जीवनाची कास स्वीकारत आहोत मात्र आपला मुलगा मी पैलवानच करणार असे म्हणणारे आई वडील हे खरे देशकार्य, महाराष्ट्राची कुस्ती परंपरा जपणारे वेगळे वाटसरू वाटतात महाराष्ट्राची कुस्ती परंपरा जपणाऱ्या आशा घराण्याकडे राज्य शासनाने लक्ष दिले पाहिजे. आर्थीक पुरवठा पेला पाहिजे तर निरोगी निर्व्यसनी समाज निर्मिती होईल. समाजाने यातून प्रेरणा, आदर्श घ्यावा. आपण स्वतः पैलवान नाही होऊ शकला तरी पैलवानांचा वडील व्हा, भाऊ व्हा, मामा व्हा, मित्र व्हा…पण नक्कीच ही मल्लविद्या टिकवा, जोपासा व वैभवा प्रति नेण्याचा प्रयत्न करा.