स्थैर्य, फलटण : समाधानकारक पाऊस, चांगले नैसर्गिक वातावरण, खते बी-बियाण्यांची पुरेशी उपलब्धता यामुळे यावर्षी 91 टक्क्यांहुन अधिक खरीप पेरा पूर्ण झाला आहे. यावर्षी अपेक्षीत क्षेत्रापेक्षा अधिक खरीप पेरणी होणार असून खरीप पिके चांगली येतील असा विश्वास प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी व्यक्त केला आहे.
फलटण तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी 350/400 मि. मी. इतकी अत्यल्प असून त्यापैकी आतापर्यंत 147.33 मि. मी. पाऊस झाला आहे, या तालुक्यात प्रामुख्याने परतीचा मान्सून ऑगस्ट/सप्टेंबर मध्ये पडतो त्यापूर्वी होणार्या वळीवावर आणि कालव्याच्या पाण्यावर खरिपाचा पेरा होतो, उर्वरित पेरण्या सुरु असून आडसाली ऊस लागणी नेहमी दि. 15 जुलै नंतर होतात परंतू यावर्षी झालेला समाधानकारक पाऊस आणि धरणातील पाणी साठे समाधानकारक असल्याने अखंडित सुरु असलेल्या नीरा उजवा कालव्यामुळे आडसाली ऊस लागणी वेगात सुरु आहेत.
खरीप बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र 14843 हेक्टर असून त्यापैकी आतापर्यंत सुमारे 11915 हेक्टर म्हणजे सुमारे 80 % हुन अधिक रब्बी बाजरीचा पेरा पूर्ण झाला आहे, उर्वरित क्षेत्रावर पेरण्या सुरु आहेत, पीक वाढीच्या स्थितीत असून बाजरीची वाढ समाधानकारक असल्याचे, मका पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 4490 हेक्टर असून त्यापैकी आतापर्यंत 3063 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सुमारे 68 % क्षेत्रावर मकेचा पेरा पूर्ण झाला आहे, यावर्षी समाधानकारक हवामान आणि बाजारात मकेची वाढती मागणी विचारात घेता मकेखालील क्षेत्रात भरीव वाढ अपेक्षीत आहे, पेरणी झालेले क्षेत्र उत्तम असले तरी काही ठिकाणी अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने त्यावर उपाय योजना सुचविण्यात आल्या आहेत, त्याबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी सांगितले.
सोयाबीन सर्वसाधारण क्षेत्र 368 हेक्टर असून त्यापैकी 215.40 हेक्टर क्षेत्रावर पेरा पूर्ण झाला आहे, सोयाबीनच्या क्षेत्रातही वाढ अपेक्षीत असल्याचे नमूद करीत पेरा झालेले क्षेत्र वाढीच्या स्थितीत, समाधानकारक आहे, तर कांदा 362 हेक्टरवर लागण पूर्ण झाली आहे, काही ठिकाणी कांद्यावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी सांगितले.
फलटण हा प्रामुख्याने रब्बीचा तालुका असला तरी बदलते हवामान व निसर्गामुळे खरिपाच्या क्षेत्रात वाढ होत असून खरिपाची पिके जोमदार असल्याने बळीराजा सुखावला आहे.