दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सामान्य, शोषित, वंचित माणसाचे हक्क त्यांना संविधानाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहाल केले. भारतीय समाज व्यवस्थेतील विषमता कमी करायची असेल व सामान्य, उपेक्षित घटकाला त्यांचे हक्क बहाल करून मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर कायदेशीर तरतूद करण्याची गरज असल्याचे ओळखून स्वातंत्र्यपूर्व काळातच 15 ऑक्टोबर, 1932 रोजी समाज कल्याण विभागाची निर्मिती झाली.
त्या घटनेला 90 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने समाज कल्याण विभागचा वर्धापन दिन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सातारा, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा व यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात दि. 15 ऑक्टोंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सहायक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सपना घोळवे, यशवंतराव चव्हाण समाज कार्य महाविद्यालयाचे अधिव्याख्याता डॉ. विजय माने, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे पोलीस निरीक्षक, नितीन माने, सहाय्यक लेखाधिकारी पोपट कोकरे उपस्थितहोते.
प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून सामाजिक न्यायाच्या स्थापने साठी उपस्थितांनी प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमाच्या प्रसंगी जाती प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्रांचे वाटप, समाज भूषण पुरस्कारथीचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील विविध घटकातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच या विभागातील कर्मचा-यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
समाजकार्य महाविद्यालयातील सहाय्यक अधिव्याख्याता डॉ. विजय माने यांनी समाज कल्याण खात्याचा प्रवास उलगडून सांगितला. कार्यक्रमासाठी समाज कल्याण खात्याचे विविध पुरस्कार प्राप्तपुरस्कारार्थी, समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, आश्रम शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, नागरिक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.