स्थैर्य, सातारा दि.१० : गेली दहा वर्षे उन्ह, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता वीज वितरण कंपनी साठी काम करणाऱ्या ८० कामगारांना पूर्व सूचना न देता कामावरून कमी केले होते. ही बाब समजल्यानंतर खटाव तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला. तत्पूर्वी कामगारांना न्याय मिळाला अशी माहिती खटावचे उप शहर प्रमुख किशोर गोडसे यांनी दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यातील वडुज येथील वीज वितरण कंपनी साठी आय टी आय पास झालेले तांत्रिक माहिती असलेले ८० कंत्राटी कामगार एका कंत्राटदाराकडे काम करीत होते. गेली दहा वर्षे नियमितपणे काम करीत असल्याने त्यांनी दुसरीकडे काम शोधण्याचा प्रयत्न केला नाही. काहींची शासकीय सेवेतील वयोमर्यादा निघून गेली होती. अशा अवस्थेत त्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने सर्वांनाच मानसिक धक्का बसला. ही बाब शिवसेनेचे खटाव तालुकाप्रमुख युवराज पाटील यांना समजताच त्यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करून संबधित भूमिपुत्र व कंत्राटी कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला.
शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख बाळासाहेब जाधव, शिवसैनिक पदाधिकारी व शिवसैनिकांची तातडीने बैठक आयोजित केली होती.तत्पूर्वी कंत्राटदार यांनी सर्व८०कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे कंत्राटदारांनी मान्य केले असल्याची आनंदाची बातमी कळली.त्यांच्या या भूमिकेचे शिवसेना व कामगारांनी स्वागत केले आहे. नववर्षाच्या प्रारंभी संकट उभे राहिले होते पण, सर्वांनी सामंजस्याने मार्ग काढला आहे. शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळे प्रसंगी रस्त्यावर उतरूण्यास तयार आहे. तरी खटाव तालुक्यात कोणावर अन्याय होत असेल तर त्यांनी स्थानिक पातळीवर शिवसेनेशी संपर्क साधावा असेही आवाहन शिवसेना वडूज उप शहर प्रमुख किशोर गोडसे यांनी केले आहे.