सातारा तालुक्यातील पाच रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी ८ कोटी २० लाख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२२ । सातारा । आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून सातारा तालुक्यातील पाच प्रमुख रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पात ८ कोटी २० लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे लवकरच या पाच रस्त्यांचे काम मार्गी लागणार आहे.

सातारा- जावली मतदारसंघात डांबरी रस्त्यांचे जाळे विणून प्रत्येक गाव, वाडी- वस्ती विकासाच्या प्रवाहात आणणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजेंनी रस्त्यांच्या कामासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्याच प्रयत्नातून पुरवणी अर्थसंकल्पात सातारा तालुक्यातील पाच रस्त्यांसाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्य मार्ग १४० ते सोनगाव, कुमठे, आसनगाव, प्र.जि.मा. ३१ कि.मी. १/०५० (सोनगाव शेळकेवाडी पूल) येथील मोठ्या पुलाच्या जोड रस्त्यासाठी भूसंपादन करणे व सुधारणा करणे यासाठी १ कोटी ५० लाख रुपये, सातारा, कोरेगाव, पंढरपूर, मोहोळ रस्ता रा.मा. १४१ कि.मी. १/३०० ते १/८०० (भाग जिल्हा परिषद अध्यक्ष बांगला ते एन.एच. ४ सातारा तालुका हद्द) ची सुधारणा करणे यासाठी १ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. लिंबखिंड, खिंडवाडी रस्ता प्र.जि.मा. ३० कि.मी. १०/४०० ते १२/२०० (भाग साईबाबा मंदिर ते शिवराज पेट्रोल पंप) ची सुधारणा करणे यासाठी १ कोटी ४० लाख, सातारा, गजवडी, ठोसेघर, चाळकेवाडी प्र.जि.मा. २९ कि.मी. २४/०० ते २६/५०० (भाग चाळकेवाडी ते सातारा तालुका हद्द) ची सुधारणा करणे यासाठी १ कोटी ८० लाख, रा.मा. १४० ते सोनगाव, कुमठे, आसनगाव रस्ता प्र.जि.मा. ३१ कि.मी. ५/०० ते ९/९०० (भाग शेरेवाडी ते आसनगाव) ची सुधारणा करणे यासाठी २ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून कामे वेळेत आणि दर्जेदार करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!