लोणंद नगरपंचायतच्या चार जागांसाठी विक्रमी ७९ टक्के मतदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१९ जानेवारी २०२२ । लोणंद । लोणंद नगरपंचायतीच्या सतरा पैकी तेरा जागांसाठी यापूर्वीच मतदान प्रक्रिया आज सुरळीत पार पडलीअसून उर्वरित चार प्रभागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार  पडली असून या चार जागांसाठी १९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद करण्यात आले. शहरात असलेल्या ०६ मतदान केंद्रांमधून सुमारे  ७९.२५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली मात्र सकाळच्या वेळेस वाढलेल्या थंडीमुळे पहिल्या दोन तासात अवघे १३ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावत आपला मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक आयोगाने व पोलीस प्रशासनाकडून मतदानावेळी कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून  जोरदार तयारी करण्यात आली होती. मतदानावेळी कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल के. वायकर तसेच प्रभारी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी नियोजन केले होते.

आज झालेल्या चार प्रभागासाठीच्या मतदानात एकुण ३४३१ मतदारांपैकी २७१९  मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रभागनिहाय झालेले मतदान व एकुण मतदान पुढील प्रमाणे आहे. प्रभाग क्रमांक एक १०२९/११९० (८६.४८%), प्रभाग क्रमांक दोन ४९७/६३९ (७७.७८%)प्रभाग क्रमांक अकरा  ७७५/१०३१ (७५.१७%)  प्रभाग क्रमांक सोळा -४१८/५७१ (७३.२०%) अशा प्रकारे मतदान झाले आहे. प्रभाग क्रमांक एकसाठी सर्वाधिक ८६ टक्के तर प्रभाग सोळासाठी सर्वात कमी ७३ टक्के मतदान झाले.

उद्या बुधवार दिनांक १९ रोजी सकाळी दहा वाजता नगरपंचायतीच्या सभागृहात सर्व १७ प्रभागांची एकत्रित मतमोजणी होणार आहे . त्यासाठी सहा टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे . सहा- सहा मतदान केंद्रांच्या दोन फेऱ्या व तिसरी पाच मतदान केंद्राच्या फेरीनुसार मतदान मशिनद्वारे मतमोजणी होणार आहे . पहिल्या सहा प्रभागांचे निकाल सकाळी साडेदहा वाजेपर्यंत जाहीर होण्याचे संकेत आहेत . दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व मतमोजणी पूर्ण होऊन सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली आहे . पहिल्या १३ जागांसाठी ५५ , तर आज झालेल्या चार जागांसाठी १९ असे एकूण ७४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत . राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस , भाजप व शिवसेना आदी सर्व पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात एकमेकांविरुद्ध लढत देत आहेत.


Back to top button
Don`t copy text!