
स्थैर्य, फलटण, दि. १ नोव्हेंबर : तरडगाव येथील चांदोबाचा लिंब येथे श्री ज्ञानोबादादा यांच्या ७५० व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ६ ते १२ नोव्हेंबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. देवानंददादा आरफळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत आहे. मात्र, चांदोबाचा लिंब येथील पालखी मार्गावर अडथळे निर्माण झाले असून, ते प्रशासनाने तातडीने दूर करावेत, अशी मागणी पारायण समितीने केली आहे.
हा पालखी सोहळा व पारायणाची परंपरा देवानंददादा आरफळकर यांनी जपली आहे. चांदोबाचा लिंब येथील नव-ज्ञानदेव मंगल कार्यालयात ६ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण, भजन, हरिपाठ, कीर्तन व प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. समितीच्या वतीने भाविकांसाठी दोन्ही वेळचे जेवण (महाप्रसाद) आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पारायण समितीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, तरडगावातून चांदोबाचा लिंब येथे जाणाऱ्या पालखी मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम झाले आहे. तसेच एका मंदिर विश्वस्त मंडळाने रस्ता अडवल्याने पालखी व वारकऱ्यांच्या येण्या-जाण्यासाठी अत्यंत अरुंद जागा शिल्लक राहिली आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजी असून, प्रशासनाने यात लक्ष घालून हा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी पारायण समितीचे अध्यक्ष सुरेश महाराज सुळे यांनी केली आहे.
या सोहळ्यासाठी विविध धार्मिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी भाविकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
