
दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२२ । सातारा । राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने सातारा तालुक्यातील खोडद हद्दीत बेकायदा गोवा बनावट विदेशी दारूची वाहतूक करणारा आयशर ट्रक पकडून तब्बल 36 हजार बाटल्यांसह सुमारे 53 लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून दोनजणांना अटक झाली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, दि. 26 रोजी खोडद, ता. सातारा हददीत पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गवर हॉटेल राजपुरोहीतसमोर गोव्यावरुन राजस्थानला जाणारी बेकायदा गोवा बनावट विदेशी दारुची वाहतूक पकडून मुकेश मोहनलाल सिसोदिया वय 39 रा. खजुरीया, ता. हातोड, जि. इंदोर, जितेंद्र भरतसिंग राठोड वय 36 रा. मेथवाडा, ता. डेपालपूर जि. इंदोर मध्यप्रदेश यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कारवाई वेळी 180 मि.ली. क्षमतेच्या विदेशी दारुच्या एकूण 36,000 बाटल्या (750 बॉक्स), एक सहाचाकी आयशर ट्रक (एमएच 14 एफटी 9614), दोन मोबाईल, दारुचे बॉक्स लपवण्यासाठी वापरलेल्या काजूच्या टरपलांच्या 47 गोणीसह एकूण 53 लाख 29 हजार 275 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही इसमांस न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे.
कारवाईमध्ये प्रभारी निरीक्षक श्री.एन.पी.क्षीरसागर, निरीक्षक संजय साळवी, दुय्यम निरीक्षक किरण बिरादार, रोहीत माने, महेश मोहिते, नितीन जाधव, सचिन खाडे, संतोष निकम, अजित रसाळ, जीवन शिर्के, किरण जंगम, भिमराव माळी, विनोद बनसोडे, राणी काळोखे यांनी भाग घेतला. प्रभारी निरीक्षक एन. पी. क्षीरसागर तपास करीत आहेत.