74 शासकीय नोकरदारांना पुरवठा विभागाच्या नोटिसा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 15 : सातारा तालुक्यात 194 गावे आहेत. या प्रत्येक गावात काही शासकीय नोकरदारांनी आपले उत्पन्न दडवून शिधा पत्रिका दारिद्र्यरेषेखालची किंवा इतर रेशन कार्डवरून लाभ घेतला  आहे. सातारा तहसील कार्यालयाकडे आलेल्या तक्रारींवरून सातारा तालुक्यातील प्रथम दोन गावात तपासणी करण्यात आली असून 74 जण आढळून आले आहेत. त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून धान्याची बाजारभावाने वसुली करण्यात येणार आहे.  तहसीलदार आशा होळकर यांनी मोहीम तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत.

सातारा तालुक्यात रेशन दुकानदारांनी वेळोवेळी शासनाच्या परिपत्रकानुसार जी जी माहिती मागवली जाते त्या माहितीनुसार पुढे कार्यवाही केली जाते. सातारा तालुक्यातील 194 गावांपैकी काही गावांमध्ये खरी माहिती दडवून ठेवून रेशनचा लाभ घेतला जातो. तशा तक्रारी दाखल झाल्याने सातारा तहसीलदार आशा होळकर यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार, सेवानिवृत्त कर्मचारी, पेन्शनधारक असूनही रेशन योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास येताच कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सातारा तालुका पुरवठा विभागाने गेल्या चार दिवसांपूर्वी राजापुरी आणि अपशिंगे मिल्ट्री या दोन गावांची तपासणी केली. अपशिंगे मिल्ट्री येथे 70 तर राजापुरी येथे 4 जण आढळून आले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याकरता कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्या नोटिसामध्ये 2014 पासून आजअखेरपर्यंत महाराष्ट्र शासन, अन्न नागरी पुरवठा मंत्रालय, मुंबई मार्फत स्वस्त धान्याचा लाभ शासकीय धान्य दुकानादाराकडून घेतल्याचे निदर्शनास येत आहे. आपण स्वतः किंवा आपले कुटुंबातील लाभार्थी सदस्य हे शासकीय कर्मचारी, सेवानिवृत्त शासकीय पेन्शनधारक आहेत, अशी खात्री झाल्याने आपणास 2014 पासून ते आजपर्यंत आपण बेकायदेशीररित्या व शासनापासून खरी माहिती लपवून ऑनलाइन शिधापत्रिका बारा अंकी नंबरद्वारे धान्याचा लाभ घेत आल्याचे निदर्शनास आले आहे. तरी आपण शासन निर्णय दि.5 नोव्हेंबर 1999 अन्वये केशरी शिधापत्रिकेऐवजी आपले उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असल्याने शुभ्र शिधापत्रिका धारण करणे आवश्यक आहे.आपण केशरी शिधापत्रिकाद्वारे कमी उत्पन्न दाखवून स्वस्त धान्याचा लाभ घेत आहात. आपण पेन्शन, पगार असा दुहेरी लाभ घेत आहात. तरी नोटीस मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत आपले म्हणणे तलाठी, रेशन दुकानदार, प्रत्यक्ष किंवा पोस्टाने सादर करावे अन्यथा आपल्यावर अत्यावश्यक सेवा अधिनियम 1995 चे विहित कलमाच्या अंतर्गत तरतुदीनुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे. दरम्यान, सातारा तहसीलदार आशा होळकर यांनी दिलेल्या आदेशानुसार सातारा तालुक्यात पुरवठा विभाग मोहीम तीव्र करण्यात येणार आहे, असे तालुका पुरवठा विभागातून सांगण्यात आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!