
स्थैर्य, सातारा, दि. 24 नोव्हेंबर : सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुकीचे राजकीय रणमैदान अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पूर्णपणे मोकळे झाले. नऊ पालिकांमधून नगरसेवक व नगराध्यक्षपदाच्या मातब्बर व अपक्ष उमेदवारांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. आता नगरसेवक पदाच्या अंतिम लढाईत 712, तर नगराध्यक्ष पदासाठी 43 उमेदवार रिंगणात आहेत. राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी गर्दी झाली. नऊ नगरपालिकांच्या 233 जागांसाठी एकूण 1 हजार 512, तर नगराध्यक्षपदाच्या 9 जागांसाठी 104 उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारांना दि. 19 ते 21 या कालावधीत अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती.
पहिले दोन दिवस नाममात्र तर शेवटच्या दिवशी अनेक मातब्बरांनी निवडणुकीच्या रणांगणातून तलवारी म्यान केल्या. नऊ नगरपालिकांच्या 233 नगरसेवक पदांसाठी आता 712 उमेदवार शिल्लक राहिले असून, या निवडणुकीत कुठे दुरंगी, कुठे तिरंगी तर कुठे राजकीय पक्षांमध्ये घमासान पाहायला मिळणार आहे. मेढा नगरपंचायतीत 17 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणार आहेत.
सातारा पालिकेत नगराध्यक्षपदाची निवडणूक ’भाजप विरुद्ध महाविकास’ आघाडी अशी होणार आहे.
तरीही एकूण नऊ उमेदवार एकमेकांना आव्हान देणार आहे. येथे नगरसेवकपदाच्या 50 जागांसाठी एकूण 169 उमेदवार रिंगणात उरले असून, येथील लढती लक्षवेधी होणार आहेत.सातारा पालिकेच्या प्रभाग 13 मधून एका अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने भाजपचे उमेदवार विनोद खंदारे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. तर प्रभाग 12 अ मधून सर्व अपक्षांनी माघार घेतल्याने येथे मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचे शिलेदार दिलीप म्हेत्रे बिनविरोध झाले. मलकापुरात भाजपच्या रंजना पाचुंदकर, वाईत राष्ट्रवादीच्या रेखा कांताराम यांनीदेखील बिनविरोधची पताका फडकविली. आता मलकापुरात सहा, सातार्यात तीन तर वाई दोन आणि मेढा नगरपंचायतीत दोन अशा एकूण 13 उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानलेली बहीण असलेल्या विमल ओंबळे यांची जबाबदारी स्थानिक नेते कुमार शिंदे यांच्याकडे सोपवली होती; परंतु दोन दिवसांपूर्वीच कुमार शिंदे यांनी अचानक त्यांचा पाठिंबा काढून प्रतिस्पर्धी विमल बिरामणे यांच्याशी हातमिळवणी केली. ही बाब ओंबळे यांनी उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घातली. मात्र, तिकडूनही अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्या नाराज होत्या. अखेर त्यांनी मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश जाहीर केला, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत.

