साहित्य संमेलनाच्या मांडवात 70 नागरिकांनी भरले देहदानाचे अर्ज


स्थैर्य, 9 जानेवारी, सातारा : सातारा येथे आयोजित करण्यात आलेले 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्यिक उपक्रमांनी तर गाजलेच पण या संमेलनात साहित्य प्रेमींनी साहित्यिक उपक्रमांचा आनंद घेत सामाजिक भानही जपल्याचे दिसून आले. संमेलनाच्या आवारात उभारण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षात जवळपास 70 नागरिकांनी देहदानाचे अर्ज भरून दिले आहेत.

छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा यांच्या वतीने संमेलनाच्या ठिकाणी वैद्यकीय मदत व तपासणी कक्ष उभारण्यात आला होता. या कक्षाच्या वतीने वैद्यकीय मदत देतानाच संमेलनाच्या पहिल्या दिवसापासून देहदान जनजागृती अभियान देखील राबविण्यात आले.

संमेलनास आलेल्या साहित्य प्रेमींनी प्राथमिक वैद्यकीय तपासणी देखील करून घेतली. यामध्ये प्रामुख्याने सर्दी, खोकला, डोकेदुखी, उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब, मधुमेह, अंगदुखी अशा तक्रारी घेऊन येणार्‍या लोकांची संख्या अधिक होती. सुमारे 400 नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला.

साहित्य संमेलनात सातारा आणि आसपासच्या गावातील बर्‍याच शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. काही शाळांमधील विद्यार्थी लांबवरून संमेलनास आले होते. त्यातील काही विद्यार्थ्यांना उलटी, चक्कर, मळमळ असे त्रास झाल्यामुळे त्यांनी देखील या वैद्यकीय कक्षात प्राथमिक उपचार घेतले.

स्वयंस्फूतीर्न नागरिकांनी देहदानाचे अर्ज भरून तर दिलेच पण त्यातील काही नागरिकांनी आपल्या सोबत काही अर्ज घतले आणि त्या अर्जाच्या प्रती काढून संपर्कातील इतर नागरिकांनाही देहदानासाठी उद्युक्त करण्याची इच्छा दर्शविली, अशी माहिती आरोग्य मदत कक्षातील आरोग्य सेवकांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!