अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास ७ वर्षे सक्तमजुरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०६ ऑगस्ट २०२२ । सातारा । लग्नाचे अमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सागर बलभीम कांबळे, वय २४, रा. लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी, सदरबझार, सातारा याला न्यायालयाने पोक्सो अंतर्गत दोषी ठरवून ७ वर्षे सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, दि. ८ ऑक्टोंबर २०१६ रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील पोवई नाका ते पोलीस मुख्यालय जाणाऱ्या मार्गावर कासट मार्केट जवळ सागर बलभीम कांबळे, वय २४, रा. लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी, सदरबझार, सातारा एका अल्पवयीन मुलीस माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण दोघे पळून जाऊन लग्न करू. तू माझ्यासोबत आली नाहीस तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईन असे सांगून तिला फुस लावून पारगाव (जोगेश्वरी), ता. आष्टी, जि. बीड या ठिकाणी घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने त्याच्या मामाच्या घरातील देव्हाऱ्यासमोर तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिच्याशी लग्न केले. आता आपले लग्न झाले आहे असे तिला सांगून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, अशी तक्रार त्या मुलीच्या आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
पोलिसांनी सागर कांबळे याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला दि.१० ऑक्टोंबर २०१६ रोजी अटक केली. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. ए. आस्वर यांनी या गुन्ह्याचा तपास करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्याची सुनावणी आज जिल्हा न्यायालयात विशेष जिल्हा न्यायाधीश ए.के.पटणी यांच्यासमोर झाली. एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायाधीश ए.के.पटणी यांनी सागर कांबळे याला पोक्सो अंतर्गत दोषी ठरवून ७ वर्षे सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सरकारी वकील म्हणून एन. डी. मुके यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार अविनाश पवार, पोलीस कॉन्स्टेबल अजित फरांदे यांनी कामकाज पाहिले. त्यांना पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस हवालदार शमशुद्दीन शेख, जी. एच. फरांदे, राजेंद्र कुंभार, अश्विनी घोरपडे यांनी सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!