दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२१ । मायणी । कलेढोण व मायणी परिसरात विविध ठिकाणी घरफोडी करून लाखो रुपयांच्या मुद्देमालाची चोरी करणार्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात मायणी पोलिसांना यश आले. पोलिसांनी आठ पैकी सात चोरट्यांना अटक केली असून दोन लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मायणी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून येथील फौजदार गुलाब दोलताडे यांच्या पथकाने नहरवाडी रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील अनिकेत अधिकराव गायकवाड वय 20 यास ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता त्याने कलेढोण येथील बंद घर फोडून टीव्ही, फ्रिज होम थेटर सागवानी खुर्ची हिरो होंडा पॅशन, प्लेजर स्कूटी, गाडी, इन्व्हर्टर बॅटरी आदी मुद्देमाल लंपास केल्याची कबुली दिली. त्यास अटक करून पोलीस कोठडीत असताना त्याने तोसिम युसुफ मुल्ला रा. वाण्याचीवाडी (मसूर) या साथीदाराच्या मदतीने मायणीतील कुबोटा ट्रॅक्टर औषध फवारणीचे ब्लोअर असा दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरल्याची कबुली दिली. त्यासही अटक करून पोलीस कोठडी असताना कसून चौकशी केली. तेव्हा अन्य साथीदारांची नावे समोर आली. गौतम प्रकाश माळी रा. माळीनगर मायणी, अमित दामोदर पवार वय 22 रा. मोहननगर मायणी, अजय रघुनाथ झिमुर रा. अंत्री (ता. शिराळा, जि. सांगली), अभिषेक कैलास गोतपागर (वय 25) रा. उरण इस्लामपूर जि. सांगली, सुरज रघुनाथ चव्हाण (वय 22) रा. माळवाडी (मसूर) ता. खटाव, प्रतीक उर्फ नयन शंकर जाधव राहणार मसुर (वाघेश्वर) ता. कराड यांना अटक करण्यात आली असून आरोपी गौतम प्रकाश माळी हा फरार झाला आहे. दरम्यान, मायणीतील पोलीस नाईक बापू खांडेकर यांनी मायणी चोरीतील 63 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गुलाब दोलताडे यांच्या पथकाने घरफोडी करणार्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्याने मायणी व परिसरातुन त्यांचे कौतुक होत आहे.