
दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२२ । सातारा । साताऱ्यात काही दिवसापूर्वी महाविद्यालयीन परिसरात दशहत माजविणाऱ्या बकासूर गॅंग टोळीतील सात जणांना पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
टोळी प्रमुख यश नरेश जांभळे (रा. झेडपी कॉलनी, शाहूपुरी), आदित्य जयेंद्र गोसावी (रा. शुक्रवार पेठ), विशाल राजेंद्र सावंत (रा. मंगळवार पेठ), साहील जमीर जमादार (रा. बुधवार पेठ), ऋतीक उर्फ विजय विनोद कांबळे (रा. बुधवार नाका), प्रज्वल प्रवीण गायकवाड (रा. अंजली कॉलनी) व शिवम संतोष पुरीगोसावी (रा. गडकरआळी) अशी त्यांची नावे आहेत.
या टोळीवर सातारा शहर, शाहूपुरी व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत खूनाचा प्रयत्न करणे, बेकायदा शस्त्र बाळगून दरोडा टाकणे, जबरी चोरी, गंभिर दुखापत अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. ही टोळी शहर परिसरात दहशत माजवत होती. प्रतिबंधात्मक कारवाया करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्यांना तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव शाहूपुरी पोलिसांनी अधिक्षक बन्सल यांच्याकडे पाठविला होता. त्यावर सुनावणी घेत अधिक्षकांनी या टोळीतील सात जणांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले. अतिरिक्त अधिक्षक अजित बोऱ्हाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ, उपनिरीक्षक मधुकर गुरव, हवालदार प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस यांनी या सुनावणी दरम्यान योग्य पुरावे सादर केले. या कारवाईचे शहर परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे.