
स्थैर्य, दि.१४: बिहारच्या मुजफ्फरपूर कोर्टाने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी बॉलिवूडच्या 7 सेलेब्रिटींना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. रिपोर्ट्सनुसार, न्यायाधीश राकेश मालवीय यांनी करण जोहर, आदित्य चोप्रा, संजय लीला भन्साळी, साजिद नाडियाडवाला, एकता कपूर, भूषण कुमार आणि दिनेश विजान यांना 21 ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत किंवा आपल्या वकिलांना निवेदन नोंदवण्यासाठी पाठवा, असे सांगितले आहे.
यापूर्वी 7 ऑक्टोबरला बोलावले होते
यापूर्वी कोर्टाने सलमान खानसह या सेलेब्सना 7 ऑक्टोबरला सुनावणीला हजर राहण्यास सांगितले होते. त्यावेळी सलमानचे वकील साकेत तिवारी यांनी जाऊन त्यांची बाजू मांडली होती. पण इतर कुणीही हजर झाले नव्हते. आता कोर्टाने अन्य सात सेलिब्रिटींच्या पत्त्यावर नोटीस पाठविली आहे. 21 ऑक्टोबरच्या सुनावणीत उपस्थित न राहिल्यास एकतर्फी आदेश पारित केला जाईल, असे त्यात नमूद केले आहे.
8 जणांविरोधात याचिका दाखल केली होती
17 जून रोजी मुजफ्फरपूरचे वकील सुधीर कुमार ओझा यांनी सुशांत प्रकरणात आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सुधीर यांनी आपल्या याचिकेत सलमान खानसह आठ जणांवर आरोप केले होते की, या सर्वांनी सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
सुशांतला जवळपास सात चित्रपटांमधून काढून टाकले गेले आणि त्याचे काही चित्रपट प्रदर्शित होऊ दिले नाहीत असा आरोप सुधीर यांनी केला होता. यामुळे निराश होऊन सुशांतने आत्महत्या केली, असे त्यांचे म्हणणे होते. सुधीर यांनी सर्व आरोपींविरोधात भादंवि कलम 306, 109, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची अपील कोर्टाकडे केली होती.