७/१२ उताऱ्यावरील मयतांची नावे हटणार अन् कायदेशीर वारसांची नोंद होणार : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव

१ एप्रिल ते १० मे दरम्यान संपूर्ण राज्यातील महसूल यंत्रणा हा उपक्रम राबविणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 04 एप्रिल 2025 | फलटण | शेतीच्या मालकी हक्कात अडथळा ठरणाऱ्या मयत खातेदार यांच्या नावांची ७/१२ उताऱ्यावरुन नोंद कमी करण्यासाठी मोठा निर्णय महाराष्ट्र शासन महसूल विभागाने घेतला असून दि. १ एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबवली जात असल्याचे निदर्शनास आणून देत फलटण तालुक्यात ही मोहिम प्रभावी रितीने राबविण्याचा निर्धार तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी व्यक्त केला आहे.

सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी होईल, खरेदी-विक्री व्यवहारात येणारे अडथळे दूर होतील, शेती विषयक कर्ज मिळवणे सोपे होईल, वारसांमध्ये मालकी हक्कासंदर्भातील कायदेशीर वाद टाळता येतील असे मत तहसीलदार डॉ. जाधव यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

या मोहिमेबाबत माहिती देताना तहसीलदार डॉ. अभिजित जाधव म्हणाले, दि. १ ते ५ एप्रिल दरम्यान तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करुन चावडी वाचन करतील आणि दि.६ ते २० एप्रिल दरम्यान कायदेशीर वारसांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याची विनंती करतील.

दि. २१ एप्रिल ते १० मे या कालावधीत न्यायप्रविष्ट प्रकरणे वगळता अन्य प्रकरणी ई-फेरफार प्रणालीद्वारे सातबाऱ्यावर वारसांची रीतसर नोंदणी केली जाईल.

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे

  1. वारस नोंदीबाबत अर्ज करताना त्यासोबत खालील कागद पत्र जोडण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. जाधव यांनी केले आहे.
  2. मृत्यू दाखला,
  3. वारस प्रतिज्ञापत्र किंवा स्वयंघोषणापत्र,
  4. पोलिस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा वारस दाखला,
  5. सर्व कायदेशीर वारसांची माहिती (नाव, वय, पत्ता, मोबाईल क्रमांक),
  6. रहिवासी पुरावा.

कोणत्याही दलालाला किंवा कर्मचाऱ्याला या नोंदणीकामी पैसे देऊ नका, महसूल विभागाने ही मोहीम पूर्णतः नागरिकांच्या हितासाठी केली असल्याचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

तालुका स्तरावर तहसीलदार समन्वय साधतील तर संपूर्ण मोहीम वेळेत पार पडेल याची जबाबदारी जिल्हाधिकारी सांभाळतील, राज्यभरातील प्रगतीवर महसूल आयुक्त देखरेख ठेवतील.

सातबाऱ्यावर आपला हक्क नोंदविण्यासाठी ही सुवर्णसंधी दवडू नका असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!