6वा आंतरराष्ट्रीय योग दिन देशभरात डिजिटल माध्यमाद्वारे साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


योगामुळे जगाचे आरोग्यपूर्ण आणि आनंदी मानव समाजात परिवर्तन घडू शकते-पंतप्रधान

स्थैर्य, नवी दिल्ली, 21 : 6वा आंतरराष्ट्रीय योग दिन देशभरात इलेक्ट्रोनिक आणि डिजिटल माध्यमाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौटुंबिक संबंध दृढ करण्यामध्ये योगाची भूमिका अधोरेखित केली. योग सर्वाना जवळ आणतो आणि मुले, वृध्द यासह  कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला जोडतो. म्हणूनच यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना कुटुंबासमवेत योग अशी ठेवल्याचे पंतप्रधान म्हणाले.

कोविड-19 मुख्यतः फुफ्फुसाशी संबंधित अवयवांवर हल्ला करतो आणि प्राणायाम श्वसनसंस्था बळकट करण्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य आणि आशा यांच्या तारा आपण जुळवल्या तर आरोग्यदायी आणि आनंदी मानव समाज असलेले जग पाहण्याचा दिवस फार दूर नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी योग आपल्याला निश्चितच उपयुक्त ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले.

कोविड-19 मुळे आंतरराष्ट्रीय योग दिनी यावर्षी सामुहिक कार्यक्रम होणार नसल्यामुळे सरकारने लोकांनी घरीच आपल्या कुटुंबीयांसमवेत योग अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. यासंदर्भात आयुष मंत्रालयाने सोशल आणि डिजिटल माध्यम मंचाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत जनतेचा ऑनलाइन सहभाग सुलभ  केला.

आंतरराष्ट्रीय योग दिन आता सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य चळवळ ठरत असल्याचे केंद्रीय आयुष राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी सांगितले. जगातले प्रत्येक राष्ट्र आता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करते, जनतेनेही याला आपलेसे केले असून भारताची संस्कृती आणि परंपरेचा उत्सव म्हणून स्वीकारल्याचे ते म्हणाले. यावर्षी आरोग्य विषयक संकट काळात आंतरराष्ट्रीय योग दिन आल्यामुळे घरीच योग क्रिया करण्यासाठी विविध ऑनलाईन आणि हायब्रीड ऑनलाईन उपक्रमातून आयुष मंत्रालय गेले तीन महिने प्रोत्साहन देत आहे. योग विषयक जागृती आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या माय लाईफ-माय योगा या व्हिडीओ ब्लॉगिंग स्पर्धेची त्यांनी प्रशंसा केली.

यामध्ये आयुष मंत्रालयाला अनेक अग्रगण्य योग संस्था सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या महिन्यात याला अधिक गती देण्याबरोबरच कॉमन योगा प्रोटोकोल प्रशिक्षणावर विशेष लक्ष पुरवण्यात आले. आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी, बदललेल्या परिस्थितीत  यावर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन घरीच साजरा करण्यावर आणि योगाचे आरोग्य विषयक लाभ यावर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले.

योग विषयक नियम आणि शिष्टाचार लोकांनी जाणावेत यासाठी आयुष मंत्रालयाने रोज सकाळी दूरदर्शनवर आणि सोशल मिडीयावर सीवायपी सत्र आयोजित करण्यासह इतर विविध ऑनलाईन उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. अनेक शैक्षणिक संस्था, सरकारी मंडळे, व्यापारी आस्थापने, औद्योगिक आणि सांस्कृतिक संस्था यांनी आपल्या कर्मचारी, सदस्य आणि संबधीतांच्या हितासाठी आपापल्या घरून आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कटीबद्धता दर्शवल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रयत्नातून देशाच्या विविध भागातून अनेक योग शाखा आणि हजारो कुटुंबे आपापल्या घरून आंतरराष्ट्रीय योग दिना मध्ये सहभागी होत असल्याचे ते म्हणाले. आयुष संजीवनी अॅप विषयी माहिती देतानाच यासाठी 5 दशलक्ष लोकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जनतेमध्ये आयुष मंत्रालयाच्या  सूचनावलीचा वापर आणि कोविड-19 रोखण्यासाठी त्याचा प्रभाव याबाबत आकडेवारी आणि माहिती गोळा करण्याचा याचा उद्देश आहे.

मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या तज्ञांनी कॉमन योगा प्रोटोकोल विषयी प्रात्यक्षिके सादर केल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला यावेळी योग तज्ञांशी चर्चाही झाली. दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून याचे प्रसारण करण्यात आले. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!