
दैनिक स्थैर्य | दि. २३ जुलै २०२४ | फलटण |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. आज सकाळपर्यंत धरणात ६४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या दोन दिवसात सुमारे १४ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
दरम्यान, महाबळेश्वर, वाई, जावली तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर दरड कोसळली असून ही दरड हटविण्याचे काम सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.