स्थैर्य, सोलापूर दि. 26 : राज्याच्या इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 466 नागरिकांना आज परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून आज देण्यात आली. कालअखेर 5657 नागरिकांना परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात येण्यासाठी 6123 नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे.
राज्याच्या इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि इतर जिल्ह्यात जाण्यासाठी तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातून परराज्यात जाण्यासाठी covid19.mhpolice.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या अर्जानुसार परवानगी देण्यात येत आहे.
एक मे 2020 पासून covid19.mhpolice.in या वेबसाईट आजपर्यंत 89218 अर्ज प्राप्त झाले असून 38904 जणांना परवानगी देण्यात आली आहे. 5290 अर्जांना परवानगी नाकारली असून 15369 अर्ज प्रलंबित आहेत. नाकारण्यात आलेले बहुतांशी अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्र जोडले नसल्यामुळे नाकारले आहेत. तर काही अर्ज इतर जिल्ह्यातून/राज्यातून मान्यता मिळाली नसल्याने प्रलंबित आहेत. वैद्यकीय कारणाबाबतचे अर्ज तात्काळ समन्वय साधून परवानगी दिली जात आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 29665 अर्जांना परवानगी दिली गेली होती पण त्यांची मुदत संपल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी एकूण 41713 नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी 35474 जणांना परवानगी दिली आहे तर 6239 जणांचे अर्ज प्रलंबित आहेत.