
दैनिक स्थैर्य । दि.२२ जानेवारी २०२२ । सातारा । सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या सभासदांचा कार्यकाल संपून आता 28 दिवस उलटले प्रशासक व मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्वसाधारण सभेचे अजेंड्यावर साठ विषय ठेवण्यात आले आहेत ही सभा 24 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता कमिटी हॉल येथे होणार आहे सातारा पालिकेच्या इतिहासात सातारा पालिकेची अंदाजपत्रकीय सभा आणि सर्वसाधारण सभा प्रथमच प्रशासक असताना होणार आहे.
सातारा पालिकेच्या सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या सभासदांची पंचवार्षिक मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपली त्यानंतर सातारा नगरपालिकेत प्रशासक राजवट लागू झाली मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे प्रशासक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे बापट यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या कामांचा आढावा घेऊन पहिली प्रशासकीय सर्वसाधारण सभा येत्या 24 जानेवारी रोजी घेण्याचे निश्चित केले आहे या अजेंड्यावर साठ विषय ठेवण्यात आले आहेत
श्रेणी 3 व 4 सेवकांच्या अनुकंपा नियुक्त्या निश्चित करणे महादरे येथील फूलपाखरू संवर्धन क्षेत्राच्या राखीव भागासाठी पर्यटन सुविधा देणे सातारा शहरात ठिकाणी हवेचे प्रदूषण मोजणारी मापक यंत्र बसविणे येत्या वर्षभरात विकास कामांसाठी लागू असणारी साहित्य खरेदी करता वार्षिक दर निश्चित करणे याशिवाय सातारा शहराच्या हद्दवाढीला नंतरच्या सुधारित भागाचा डीपीआर तयार करणे व पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून उद्भव क्षेत्रांचे अद्ययावतीकरण इत्यादी विषय महत्त्वाचे विषय अजेंड्यावर ठेवण्यात आले आहे.
या सभेचे स्वरूप राजकीय नसणार आहे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना विभाग प्रमुखांकडून येणारे ठराव 83 अंतर्गत थेट मंजूर करण्याची कायदेशीर मुभा आहे. त्यामुळे या सभेमध्ये विषय वाचन आणि त्यावर चर्चा या माध्यमातून सातारा शहरातील प्रलंबित प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. विषयांचे वाचन सभासचिव अतुल दिसले करणार आहेत . सातारा शहरातील विद्युतीकरणाची कामे तसेच पथदिवे आणि काही जागांचे विकसन इत्यादी विषय पुढील काळातील त्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन अजेंड्यावर घेण्यात आले आहेत.