
स्थैर्य, 7 जानेवारी, सातारा : माण,खटाव तालुक्यासह कोरेगांव व सातारा तालुक्यातील एकूण 167 गावातील सुमारे 60437 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणण्यासाठी आदरणीय लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर योजनेच्या विस्तारीत कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. नजीकच्या काळात ही योजना पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत झाल्यावर कायम दुष्काळी म्हणून हिणवल्या गेलेल्या माण-खटाव आदी भागात हरितक्रांती होवून, ही भुमी सुजलाम-सुफलाम होईल याचे विशेष समाधान आहे असे नमुद करुन, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी निधी वाटपात, केंद्रशासनाने सातारा जिल्हावासियांच्या प्रेमापोटी प्रधानमंत्री सिंचाई योजना, आवास योजना, ग्रामसडकयोजना, सीआरएफ, पेयजल, आदी योजनांचे माध्यमातून सातारा जिल्ह्याला नेहमीच भरभरुन देताना झुकते माप दिले आहे.
याबाबत अधिक माहीती देताना खा. श्री. छ.उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे की, सन 1996-97 ला आम्ही कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना, माण-खटाव तालुक्याचा दुष्काळी भाग म्हणून बसलेला ठपका पुसण्यासाठी आणि जललवादाप्रमाणे महाराष्ट्राच्या वाटयाला येणारे पाणी वापरण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातुन पाणी अडवण्याचे परिपूर्ण नियोजन तत्कालीन युती शासनाच्या सहकार्याने आखले. . त्यानुसार उरमोडी धरणासह लहान धरणे आणि जिहेकटापूर उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आल्या. जिहे कटापूर साठी मुळ प्रशासकीय मान्यता ही 269 कोटी रुपयांची मिळवण्यात आली. त्यानंतर 2022 मध्ये सदर योजनेचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये करण्यात आला. त्यामुळे योजनेच्या पूर्ततेसाठी केंद्राकडून भरीव निधी प्राप्त झालात्यानंतर एकूण तीन वेळा सुधारित प्रशासकीय मंजूरी घेण्यात येवून आज रोजी प्रकल्प अंतिम टप्याचे जवळ पोहोचला आहे. एकूण 60437 हेक्टरक्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने, बळीराजा निश्चितच सुखावणार आहे.
जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनेसाठी केंद्रीय जलमंत्री ना.सी.आर.पाटील तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, ना.अजित पवार, जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांचेसह अनेकांची मोलाचे सहकार्य लाभले आहे.
जिहे कटापूर योजनेअंतर्गंत 11 उपसा सिंचन योजना, 3 बॅरेज 4-गुरुत्वीय नलिका, येरळा नदीवर 15 आणि मागण नदीवर 17 कोल्हापूर टाईप बंधारे बांधणे, 4.095 कि.मी.चा वर्धनगड बोगदा, 12.746 कि.मी.चा आंधळी बोगदा या प्रमुख कामांचा समावेश आहे. प्रकल्पांतर्गंत कृष्णानदीमधून खरीप हंगामात 6.332 अ.घ.फू.पाणी उपसा करुन सातारा जिल्हयातील दुष्काळग्रस्त खटाव, माण,कोरेगांव सातारा तालुक्यातील 167 गांवातील 60437 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
सध्या येरळा नदीवर 15 आणि माण नदीवर 17 असे कोल्हापूर टाईप बंधारे पूर्ण झाले आहेत. वर्धनगड बोगदयाचे काम सन 2016 मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. जिहे कटापूर बॅरेजचे काम सप्टेंबर 21 मध्ये पूर्ण करण्यात आले आहेत. मुख्य उर्ध्वगामी नलिका क्रमांक 1 चे काम सप्टेंबर 21 मध्ये पूर्ण करण्यात येवून, योजनेचे पाणी नेर धरण व येरळा नदीत सोडले आहे. आंधळी बोगदयाचे काम नोव्हेंबर 23 मध्ये पूर्ण करण्यात येवून योजनेचे पाणी फेब्रूवारी 24 मध्ये आंधळी धरणात सोडण्यात आलेले आहे. आंधळी गुरुत्वीय नलिकेच्या मुख्य नलिकेचे काम पूर्ण आहे. आंधळी उपसा सिंचन योजनेचे काम नोंव्हेबर 24 मध्ये किलोमिटर 33 पर्यंत पूर्ण झाले आहे.
प्रकल्पांतर्गंत नेर उपसा सिंचन क.1 व क्र.2, आंधळी उपसा सिंचन योजना, मुख्य उर्ध्वगामी नलिका क्रमांक 2 यांची कामे प्रगतीपथावर असून, जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पाची राहीलेली सर्व कामे मार्च 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
निविदा प्रक्रीया सुरु झाल्याने लवकरच उर्वरित कामांची पूर्तता होवून, सातारा जिल्हयातील दुष्काळी भागात हरितक्रांति घडून येईल असा विश्वास आहे, असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.

