स्थैर्य, सातारा, दि. 19 : बोरगाव (ता.सातारा) येथे वन्य श्वापदाने केलेल्या हल्ल्यात ६ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. बुधवारी रात्री ही घटना घडली.या घटनेची माहिती वनविभाग व नागठाणे पशुवैद्यकीय दवाखान्यात देऊनही घटनास्थळी कोणीच फिरकले नाही.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव ते शेतीशाळा जाणाऱ्या रस्त्यालगत वाडग्याचा माळ नावाच्या शिवारात कैलास भानुदास झुंजार यांचे शेळीपालनाचे शेड आहे.त्यांच्या सुमारे २२ शेळ्या या शेडमध्ये असतात.बुधवारी दिवसभर शिवारात या शेळ्या चरण्यासाठी सोडल्या होत्या.सायंकाळी या सर्व शेळ्या शेडमध्ये बंदिस्त करून ते घरी आले.
रात्री उशिरा वन्य श्वापदाने या शेडमध्ये प्रवेश करून सहा शेळ्या ठार केल्या.यामध्ये १ बोकड,३ मोठ्या शेळ्या व २ लहान शेळ्यांचा समावेश आहे.गुरुवारी सकाळी कैलास झुंजार शेडकडे गेले असता ही घटना उघडकीस आली.या घटनेची माहिती त्यांनी या विभागातील वनकर्मचाऱ्याला दिली.मात्र सायंकाळपर्यंत कोणीही घटनास्थळी फिरकले नाही.तसेच याची माहिती नागठाणेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन स्विच ऑफ सांगण्यात येत होता.तर पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्याने ‘ लॉकडाऊनमुळे दवाखाना १२ वाजेपर्यंतच उघडा असतो.शेळ्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी तुम्हीच उद्या मृत शेळ्या नागठाणेला घेऊन या’ असे उत्तर देण्यात आल्याने शुक्रवार पर्यंत या सहाही मृत शेळ्यांची कलेवर शेडमध्येच ठेवावी लागली.गुरुवारी सायंकाळपर्यंत वनविभाग व नागठाणे पशुवैद्यकीय दवाखान्यातील कोणताच कर्मचारी घटनास्थळी फिरकला नाही.सहा शेळ्या वन्य श्वापदाने ठार केल्याने कैलास झुंजार यांचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.