
दैनिक स्थैर्य । दि. १५ नोव्हेम्बर २०२२ । मुंबई । व्हेंचर कॅटालिस्ट्स ग्रुप (व्हीकॅट्स++) या भारतातील प्रारंभिक ते विकासाच्या टप्प्यावर असलेल्या स्टार्टअप्ससाठी पहिल्या एकीकृत इनक्यूबेटर व फुल-स्टॅक गुंतवणूकदार कंपनीने घोषणा केली की त्यांच्या जवळपास ५४ पोर्टफोलिओ स्टार्टअप्सनी यंदा ५० दशलक्ष डॉलर्स मूल्याचा टप्पा पार केला आहे. यंदा निधीमध्ये ७० टक्के घट झाल्याने आव्हानात्मक काळ असताना देखील व्हेंचर कॅटालिस्ट्सने लक्षणीय वाढ केली, जेथे त्यांनी पोर्टफोलिओमध्ये ३३ हून अधिक सूनिकॉर्न्स व १०० हून अधिक मिनीकॉर्न्सचा समावेश केला. किमान दोन डझन कंपन्यांच्या वैयक्तिक मूल्यांकनांनी १०० दशलक्ष डॉलर्सचा टप्पा पार केला आहे आणि गेल्या वर्षभरात जवळपास तीन स्टार्टअप्स – शिपरॉकेट, भारतपे व वेदांतू यांनी युनिकॉर्न दर्जा संपादित केला आहे.
व्हेंचर कॅटालिस्ट्स ग्रुपचे सह-संस्थापक डॉ. अपूर्व रंजन शर्मा म्हणाले, “फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील गुंतवणूकदार व स्टार्टअप्समध्ये संभाव्य फंडिंग विंटरबाबत भितीचे वातावरण असल्यामुळे मूल्यांकनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यामधून पोर्टफोलिओ कंपन्यांचा विकास व अप-राऊंड्सचे महत्त्व दिसून येते. आमच्या बहुतांश पोर्टफोलिओंनी गेल्या दोन वर्षांत उत्तम कामगिरी केली आहे आणि आम्हाला पुढील वर्षात किमान ३ ते ४ कंपन्या युनिकॉर्न्स बनवण्याची अपेक्षा आहे.’’
व्हेंचर कॅटालिस्ट्स ग्रुप किंवा व्हीकॅट्स++ हा प्रांरभिक ते विकासाच्या टप्प्यावरील फंड आहे, ज्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यापासून ते क्षेत्र केंद्रित अशा पाच फंडांचा समावेश आहे. कंपनीने २०२० मध्ये प्रथम आपला १५० दशलक्ष डॉलर्सचा प्रवेगक फंड लॉन्च केला होता, ज्यात आणखी चार फंड्स लॉन्च केले आहेत – व्हेंचर कॅटलिस्ट्स एंजल फंड, २०० दशलक्ष डॉलर्स फिनटेक फोकस्ड फंड बीम्स, प्रोपटेक फंड स्पायर आणि २०० दशलक्ष डॉलर्स ग्रोथ स्टेज सेक्टर अॅग्नोस्टिक फंड एलीव्ह८. ग्रुपकडे ३०० पेक्षा अधिक स्टार्टअप्सचा एकत्रित पोर्टफोलिओ आहे, ज्यांचे एकत्रित मूल्यांकन जवळपास १० बिलियन डॉलर्स इतके आहे. त्यामुळे ते देशातील सर्वात मोठे प्रारंभिक ते विकासाच्या टप्प्यातील गुंतवणूकीचे व्यासपीठ बनले आहे.