
दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२२ । सातारा । कास धरणाची उंची वाढवल्यानंतर सातारकरांना मुबलक पाणी मिळण्यासाठी कास ते सातारा अशी नवीन मोठ्या क्षमतेची जलवाहिनी, जलशुद्धीकरण केंद्र व इतर तत्सम बाबी करणे आवश्यक होते. या नवीन पाणीपुरवठा प्रकल्पासाठी केंद्र शासनाच्या अमृत अभियानातून १०२.५६ कोटी रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, या निधीमध्ये ५२.९९ कोटी निधी हा राज्य शासनाकडून देण्यात आला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून राज्य शासनाकडून सदर प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झाला असून याबद्दल सातारकारांच्यावतीने शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
कास धरणाची उंची वाढवण्याचे महत्वाकांक्षी काम मार्गी लावल्यानंतर कासचे वाढीव पाणी सातारकरांना लवकरात लवकर मिळावे यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु होता. केंद्र शासनाने अमृत अभियानांतर्गत राज्यातील ४४ शहरांना निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा समावेश असून या प्रकल्पासाठी एकूण १०२.५६ कोटी निधी मंजूर असून त्यापैकी केंद्र शासनाकडून ३४.१८ कोटी निधी मिळाला आहे. राज्य शासनाकडून या प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री ना. शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून राज्य शासनाकडून तब्ब्ल ५२.९९ कोटी निधी उपलब्ध झाला असून उर्वरित १५.३९ कोटी निधी हा नगर पालिकेने उपलब्ध करावयाचा आहे.
पाणीपुरवठा प्रकल्पासाठी मंजूर १०२.५६ कोटी निधीतून कास धरण ते सातारा अशी नवीन वाढीव क्षमतेची जलवाहिनी टाकणे, जलवाहिनी टाकण्याच्या मार्गावर येणाऱ्या ओढ्या नाल्यांवर आरसीसी बांधकाम करून पाणी पुढे नेणे, सांबारवाडी येथे वाढीव क्षमतेचे जलशुद्धीकरण बांधणे, वाढीव पाणी क्षमतेनुसार नवीन पाण्याची टाकी व इतर आवश्यक बाबींची उभारणी करणे, जलशुद्धीकरण केंद्राला संरक्षक भिंत बांधणे आदी कामे होणार आहेत. कास धरणाची उंची वाढली मात्र वाढीव क्षमतेने सातारकरांना पाणी कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला होता. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्नही निकाली निघाला असून राज्य शासनाच्या भरीव निधीमुळे केंद्र शासनाने अमृत अभियानातून पाणीपुरवठा प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्य शासनाच्या मोलाच्या आर्थिक साहाय्यामुळे कास धरणाचे मुबलक पाणी सातारकरांना मिळणार आहे. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तमाम सातारकरांच्यावतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले आहेत.