
स्थैर्य, फलटण, दि. १ सप्टेंबर : मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी फलटण तालुक्यातून मदतीचा ओघ सुरूच आहे. मराठा क्रांती मोर्चा, फलटणच्या वतीने मुंबईतील आंदोलकांसाठी तब्बल ५० हजार लाडू आणि मोठ्या प्रमाणात चिवडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, या अन्नदानाच्या कार्यात मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्तपणे आणि मोफत सहकार्य देऊ केल्याने, फलटणमधून मराठा-मुस्लिम सामाजिक ऐक्याचे एक अनोखे दर्शन घडले आहे.
मुंबईत आंदोलकांना प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने आणि त्यांची गैरसोय होत असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर, फलटण तालुक्यातील समाजमन हेलावले. आपल्या बांधवांची खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने पुढाकार घेऊन अन्न-साहित्य तयार करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी मुस्लिम समाजातील अनेक तरुण आणि ज्येष्ठ कार्यकर्ते स्वतःहून पुढे आले आणि त्यांनी लाडू-चिवडा बनवण्याच्या कामात सक्रिय सहभाग घेतला.
या उपक्रमातून, आरक्षणाच्या लढ्याला केवळ मराठा समाजाचाच नव्हे, तर इतर समाजांचाही पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यालयात सध्या अनेक कार्यकर्ते एकजुटीने हे साहित्य तयार करत आहेत.
तयार झालेले लाडू आणि चिवडा लवकरच मुंबईतील आझाद मैदानावर असलेल्या आंदोलकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. या कृतीतून, फलटण तालुक्याची सामाजिक सलोख्याची परंपरा अधिक घट्ट झाली असून, आंदोलनाला एक नवे बळ मिळाले आहे.