दैनिक स्थैर्य । दि. १७ एप्रिल २०२३ । मुंबई । सत्तेची नशा कधी, कशी व कुणाला लागली हे उद्धव ठाकरे यांनी सांगूच नये. ते जनतेला चांगलेच ठाऊक आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या व्यसनापायी ठाकरे यांनी भाजपाच्या पाठीत खंजिर खुपसून २०१९ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले. ठाकरे यांच्याकरिता सत्ता हेच साध्य आहे. त्यांना सत्तेचे व्यसन जडले आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
तिन्ही पक्षाचा विचार महाराष्ट्राचा सत्यानाश करायचा आहे. मविआच्या सभांमध्ये एक नेता वेगळे बोलतो, इतर तीन लोक वेगळेच बोलतात, अर्धी गर्दी कार्यक्रम सोडून निघून जाते. काल नागपूरच्या सभेत उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना ५० टक्के लोक निघून गेले होते. तीन पक्ष आप-आपले लोक आणतात गर्दी जमवितात, गाड्या-घोड्या लावतात लोक येतात एन्जॉय करतात आणि निघून जातात, अशी टीका बावनकुळेंनी केली.
अजित पवार हे भाजपात येणार अशी चर्चा आहे, हालचाली सुरु आहेत का, यावर बावनकुळे यांनी आपल्याला काही माहिती नाही असे सांगितले. आमचा हा महिना प्रवेशाचा आहे. जर-तरला राजकारणात अर्थ नाही. पक्षामध्ये कोणीही आले तरी स्वागतच आहे. भाजपची विचारधारा मान्य असावी आणि त्यानुसार काम करायची तयार असेल तर स्वागत आहे, असे बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांचा नागपूर येथे फडतूस म्हटले. कुटुंब प्रमुख जेव्हा फडतूस असतो, तेव्हा घराचे वासे फिरतात. म्हणूनच 40 जिगरी सहकारी ठाकरेंना सोडून गेले. त्यावरून फडतूस कोण हे आपोआप सिद्ध होते, असा टोलाही बावनकुळेंनी लगावला.