स्थैर्य, मुंबई, दि.१२: मुंबईत मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरु असल्याचं आपण पाहतो. पण ही बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही अनेक सोसायट्यांकडे ‘ऑक्युपेशन सर्टिफिकेट’ (ओसी) नसते. मुंबईत दोन लाखापेक्षा जास्त बांधकाम झाली आहेत. पण निम्म्या बांधकामांना ओसी प्रमाणपत्रच मिळालेले नाही असे रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांचा दावा आहे.
‘मुंबई शहरात जवळपास २.३५ लाख बांधकाम आहेत. यात व्यावसायिक आणि रहिवाशी दोन्ही प्रकारच्या बांधकामांचा समावेश आहे. पण ५० टक्के बांधकामांना ओसी प्रमाणपत्रच मिळालेलं नाही’ याकडे हाऊसिंग तज्ज्ञ संजय चतुर्वेदी यांनी लक्ष वेधले. ‘खरं पाहायला गेलं तर ओसीशिवाय इमारतीमधील फ्लॅटची किंमत शून्य आहे’ असे चतुर्वेदी सांगतात.
रिअल इस्टेट क्षेत्रातील दुसरे तज्ज्ञ विनोद संपत यांचे सुद्धा असेच मत आहे. मुंबईतील एकूण बांधकामांपैकी जवळपास ४० टक्के बांधकामांना ओसी प्रमाणपत्र मिळालेले नाही असे त्यांनी सांगितले. मुंबईत कुठलीही इमारत बांधताना परवानगीचे वेगवेगळे टप्पे पार करावे लागता. ओसी प्रमाणपत्र हा शेवटचा टप्पा असतो.
ओसी मिळाल्यानंतर गृह खरेदीदार फ्लॅटमध्येच रहायला येऊ शकतात. ओसी प्रमाणपत्र मिळण्याआधीच इमारीत रहायला गेलेल्या रहिवाशांविरोधात कारवाई करण्याचे आदेश जुलै महिन्यात देण्यात आले होते. महारेराने महापालिकेला बिल्डर आणि रहिवाशांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.