
स्थैर्य, सातारा, दि. 12 : ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या वीजयंत्रणेची पुन्हा उभारणी करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील महावितरणचे सात अभियंत्यांसह 50 कर्मचारी मंडणगड परिसरात (जि. रत्नागिरी) युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करीत आहेत.
गेल्या 3 जून रोजी ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा कोकणच्या किनारपट्टीला मोठा तडाखा बसला. प्रामुख्याने रायगड व रत्नागिरीसह इतर काही जिल्ह्यातील वीजयंत्रणेची मोठ्या प्रमाणात हानी झाली. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 7800 वीजखांब जमीनदोस्त झाले आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी इतर जिल्ह्यातून महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांचे पथके पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे बारामती परिमंडलाकडून सातारा जिल्ह्यातील महावितरणचे सहा अभियंते व 14 जनमित्र तसेच कंत्राटदारांचे 30 कर्मचारी मंडणगड तालुक्यात वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहे. या तालुक्यातील वेळास, उमरोली, बाणकोट, कुडुक बु. नारायणनगर आदी गावांच्या परिसरात जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा दुरुस्तीचे काम गेल्या 6 जूनपासून हे अभियंते व कर्मचारी करीत आहेत.
चक्रीवादळाच्या तडाख्याने मंडणगड तालुक्यातील वीजयंत्रणेला अभूतपूर्व तडाखा बसल्याचे दिसून येत आहे. मन विषण्ण करणाऱ्या या आपत्तीमध्ये खंडित झालेला वीजपुरवठा अविश्रांत दुरुस्ती कामांद्वारे लवकरात लवकर सुरु करण्याचे प्रयत्न अभियंते व कर्मचाऱ्यांकडून सुरु आहेत. या पथकांमध्ये सहाय्यक अभियंता नितीनराज माने, रुपेश लादे (वडूज), दीपक घोलप (फलटण), कनिष्ठ अभियंता किशोर कहर, नितीन खैरमोडे, (फलटण), राकेश पडवाल (सातारा), वैभव राजमाने (कराड) यांच्यासह जनमित्र सुनील गडकरी, ज्ञानदेव गुरव, संतोष प्रजापती (वडूज), संजय बुधावले, विजय फाळके, तानाजी कसबे (सातारा), चंद्रकांत झिंबरे, विठ्ठल पवार, प्रवीण कदम (कराड), दीपक टेंबरे, अजित माने, विजय मदने (फलटण) आदींसह कंत्राटदारांच्या 30 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.