
स्थैर्य, सातारा, दि. 16 : शासनाने दोन लाखापर्यंत थकबाकी असणा- या शेतक- यांना कर्जमुक्तीचा लाभ देणेचे जाहिर केलेनुसार त्याची अंमलबजावणी सुरु आहे . त्याचप्रमाणे नियमित परतफेड करणा- या शेतक- यांना रु .५० हजारपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देणेचे शासनाने जाहिर केलेले आहे. कोरोनाचा काळ संपताच पुढील दोन महिन्यात बजेटमध्ये जाहीर केलेल्या घोषणेप्रमाणे निश्चित अंमलबजावणी होईल अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी दिली.
ना. जयंत पाटील हे मुंबईला निघाले असताना साताऱ्यात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आ. मकरंद पाटील, बँकेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सुनील माने माजी आ. प्रभाकर घार्गे , संचालक नितीन पाटील यांनी त्यांची भेट घेतली. भेटीत कर्ज मुक्ती योजनेत २ लाखाच्या आतील पात्र कर्जदारांचा समावेश आहे. तथापि मुळ कर्ज रक्कम रु. दोन लाखापेक्षा कमी असणारी व व्याजामुळे एकत्रीत रक्कम रु. दोन लाखापेक्षा जादा होणारे तसेच मुळ कर्ज रक्कम रु. दोन लाखापेक्षा जादा असणा-या थकीत शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. सदरचे थकबाकीदार योजने पासून वचित राहणार आहेत . त्यामुळे रक्कम रु. दोन लाखावरील थकबाकीदार सभासदांना किमान रु. दोन लाखापर्यंतचा लाभ मिळणे आवश्यक आहे. शासनाने सध्या स्विकारलेल्या धोरणाप्रमाणे रु. दोन लाखापर्यंतच्या शेतक-यांना ज्याप्रमाणे बँकांना शासन येणे दाखवून नविन कर्जवाटप करणेच्या सुचना केलेल्या आहेत. त्याच पध्दतीने रु. दोन लाखावरील थकबाकीदार शेतक-यांना रु. दोन लाखापर्यंतची रक्कम शासन येणे दाखवून उर्वरीत रक्कम भरुन नविन कर्जवाटप करणेचा शासन निर्णय होणे आवश्यक आहे अशी विनंती आ. मकरंद पाटील, बँकेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सुनील माने माजी आ. प्रभाकर घार्गे, संचालक नितीन पाटील व संचालकांनी केली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतक-यांना पिक कर्जाशी निगडीत शेतकरी कॅश क्रेडीट पीक कर्ज योजना नियमित व्याजदराने सुरु केली आहे सदर योजनेच्या माध्यमातून बँकेने शेतक-यांना पिक कर्ज वितरीत केले असलेने व शासनाची कर्ज मुक्ती योजना ही शेतक-यांनी घेतलेल्या थकीत अल्प मुदत पिक कर्जाशी निगडीत असलेने सदर कर्ज योजनेचा समावेश महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेत करुन घेणेची मागणीही त्यांनी केली.
याबाबत बोलताना ना. जयंत पाटील म्हणाले, शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकार गंभीर आहे. कोरोनामुळे अडचणी आल्या मात्र कोरोनाचा काळ नक्की संपेल . नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत बजेट अधिवेशनात घोषणा केली गेली आहे. पुढच्या दोन महिन्यात आर्थिक स्थिती विचारात घेऊन शेतकऱ्यासंदर्भात केलेल्या घोषणाबाबत अंमलबजावणी करणेच्या दिशेने आमची वाटचाल राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे.
यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे , माजी कृषी सभापती शशिकांत पिसाळ, राजकुमार पाटील, नारायण जाधव, भरत देशमुख, जितेंद्र कदम, धीरज नलावडे व पदाधिकारी उपस्थित होते.