शिवकाशीत फटाक्यांच्या 50% ऑर्डर बुक, भाववाढ नाही, मागणी पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, चेन्नई, दि ६: देशातील फटाका हब तामिळनाडूतील शिवकाशीमध्ये फटाका कारखान्यांत उत्साह परतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्के ऑर्डर बुक झाल्या आहेत. दिवाळीआधी या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कारखान्यांत रात्रंदिवस काम सुरू आहे. सुरुवातीस कोरोनाच्या परिणामामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता. या वेळी फटाक्यांची मागणी नगण्य राहील,अशी कारखानदारांना भीती आहे. यामुळे फटाक्यांच्या किमती न वाढण्याचे बाेलले जात आहे.

तामिळनाडू फायर वर्क्स अँड अॅमोर्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे(टीएएनएफएएमए) अध्यक्ष गणेशन म्हणाले, देशव्यापी लॉकडाऊनमुळे फटाके तयार करण्यास वेळ मिळाला नाही. यामुळे १४०० कोटींचेच उत्पादन होऊ शकले. हे एकूण उत्पादनाच्या ७० टक्के आहे. या वेळी खूप कमी माल पुरवठा होईल, अशी शक्यता होती. मात्र, आता ५० टक्के ऑर्डर आल्या आहेत. नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यात व्यवसायात आणखी उठाव येईल, अशी गणेशन यांना आशा आहे.

वेलावन फायर वर्क्सचे सहसंस्थापक एलांगन म्हणाले, सर्वसाधारणपणे ऑर्डरचे चार राऊंड मिळतात. पहिल्या राऊंडमध्ये डिसेंबर ते जानेवारी, दुसरा मार्च, तिसऱ्यात जून आणि चौथा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ऑर्डर मिळतात. या वेळी जून आणि सप्टेंबर राऊंड पूर्ण रिकामा गेला. त्यामुळे बराच माल खराब झाला होता. आता मात्र स्थिती सकारात्मक झाली आहे आणि या महिन्याच्या सुरुवातीला ऑर्डर मिळू लागल्या आहेत. एवढेच नव्हे तर साठ्यातील ९०% माल विकला गेला आहे.उत्तरेत फटाक्यांचा पुरवठा करणारे प्रमुख विक्रेते राजा चंद्रशेखर यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांत दिवाळीच्या दोन महिने आधी विक्री सुरू होते. मात्र, या वेळी तसे झाले नाही. आनंदाची बाब म्हणजे, आता यूपी, गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातून ऑर्डर येत आहे. याआधी फटाका उद्योगास दसरा व गणेश चतुर्थीदरम्यान विक्रीत घसरणीचा सामना करावा लागला. सदर बाजार दिल्ली फटाका मार्केटचे अध्यक्ष नरेंद्र गुप्ता म्हणाले, या वेळी पूर्णपणे ग्रीन फटाके विकले जात आहेत.

ग्रीन फटाक्यांसाठी जास्त खर्च

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काैन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च आणि नीरीकडून तयार केलेला फॉर्म्युला फटाका उत्पादकांना दिला आहे. व्यावसायिकांनुसार, या फॉर्म्युल्यामुळे कमी आवाज आणि प्रकाशासोबत दीर्घकाळ फटाके सांभाळणे कठीण आहे. प्रदूषणाचे प्रमाण केवळ २५ ते ३० टक्क्यांपर्यंत कमी होईल. ग्रीन फटाक्यात रसायन मिश्रण महागडे असल्यामुळे किंमत ५०% जास्त आहे.

ग्रीन टॅगसह फटाके

६०० कारखान्यांशी संबंधित संघटना टीएएनएफएएमएनुसार, नव्या फटाक्यांचा खरेपणा पारखण्यासाठी त्यांना क्यूआर कोडशी जोडले आहे. यासोबत ८०% फटाक्यांना टॅग लावला जाईल. यासाठी मोठी रक्कम गुंतवावी लागते.

शिवकाशीचा ३ हजार कोटींचा उद्योग

शिवकाशीमध्ये जवळपास १०७० परवानाधारक फटाका कारखाने आहेत. या युनिटचा जवळपास २,५०० ते ३,००० कोटी रुपयांचा बाजार आहे. या उद्योगात प्रत्यक्ष रूपात ३ लाख लोक काम करतात.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!